मालेगावला मनपात शिक्षकांची बोगस भरती

आ. मौलाना मुक्ती; दहा कोटींच्या फरकाची रक्कम काढल्याचा विधिमंडळात आरोप

मालेगाव : प्रतिनिधी
मालेगाव महापालिका शिक्षण विभागाने सर्वोच्च व उच्च न्यायालयाचे उल्लंघन करून दहा शिक्षकांची बोगस भरती केली आहे. या भरतीत मंत्रालयातील अनेक अधिकार्‍यांचादेखील समावेश आहे. बोगस भरतीतून शासनाकडून दहा कोटी रुपयांची फरकाची रक्कम काढल्याचा आरोप आमदार मौलाना मुफ्ती यांनी पावसाळी अधिवेशनदरम्यान विधिमंडळात केला.

मालेगावसह नाशिक जिल्ह्यात शिक्षण विभागात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार वाढला आहे. मागील तारीख दाखवून शिक्षकांची भरती केली जाते. शिक्षण विभागातील अनेक अधिकार्‍यांकडे फार्महाउस, थ्री स्टार हॉटेल यांसह अनेक जमिनी आहेत. त्यांची बदली होते. परंतु काही दिवसांनी ते अधिकारी पुन्हा त्या ठिकाणी दिसतात. अशा अधिकारी व संस्थाचालकांवर गुन्हे दाखल करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी करून ते म्हणाले, बहुतेक संस्थाचालक बोगस शालार्थ आयडी, बोगस सह्या, बोगस भरती करून शासनाचा कोट्यवधी रुपयांचा निधी लाटत आहेत. या भ्रष्टाचारात शिपायापासून ते मंत्रालयापर्यंत अनेक अधिकारी गुंतले आहेत.
संबंधित अधिकारी गेल्या पंधरा वर्षांपासून एकाच ठिकाणी कार्यरत आहेत. मालेगाव महापालिका शिक्षण विभागाने सर्वोच्च व उच्च न्यायालयाचे उल्लंघन करून सन 2009 ते 1 जुलै 2025 पर्यंत दहा शिक्षकांची बोगस भरती केली आहे. या भरतीत मंत्रालयातील अनेक अधिकार्‍यांचादेखील समावेश आहे. बोगस भरतीतून शासनाकडून दहा कोटी रुपयांची फरकाची रक्कम काढण्यात आली आहे. यासंदर्भात शिक्षणमंत्र्यांकडे तक्रार दाखल केल्यानंतर प्रधान सचिवांना चौकशीचे आदेश दिल्याचे त्यांनी सांगितले.

फरकाची रक्कम वसूल करा

राज्यात शिक्षण विभागात होत असलेल्या गैरव्यवहाराविरोधात कारवाई करावी. तसेच संस्थाचालकांवरदेखील गुन्हे दाखल करावेत. फरकाची कोट्यवधी रुपयांची रक्कम लाटण्यात आली आहे. ती वसूल करावी, अशी मागणी त्यांनी सभागृहात केली.

एसआयटीमार्फत चौकशी करू : भुसे
शिक्षणमंत्री दादा भुसे म्हणाले की, यासंदर्भात काही दिवसांपूर्वी चौकशीचे पत्र दिले आहे. त्यावर कारवाई सुरू आहे. या प्रकरणात कोणालाही सोडले जाणार नाही. प्रस्ताव सादर करताना संस्थाचालकांचा समावेश असतो. दोषी संस्थाचालकांवरदेखील कारवाई होईल. यासाठी वरिष्ठ एसआयटीमार्फत चौकशी केली जाणार असल्याचे भुसे यांनी सांगितले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *