गड-किल्ले, डोंगरदर्या चढून तिथल्या निसर्गसौंदर्याने भारावून जाणे आणि इतिहासाची माहिती घेणे असा दुहेरी आनंद मिळतो तो गिर्यारोहणातून! अनेक तरुण गिर्यारोहकांना खुणावतात ती सह्याद्रीची शिखरे! सह्याद्रीच्या कुशीतले गडकिल्ले, डोंगरदर्या त्यांना साद घालत असतात.
गिर्यारोहणाची आवड असलेल्या तरुणांनी एकत्र येत अनेक संस्था स्थापन करून त्याद्वारे गिर्यारोहणात निपुण असलेल्या आणि नवख्या असलेल्या अशा दोन्ही प्रकारच्या तरुणांना सामावून घेतले आहे. दर आठवड्याला सुट्टीच्या दिवशी एखाद्या किल्ल्यावर जाऊन तरुण तेथील ऐतिहासिक पार्श्वभूमी तर जाणून घेतातच. शिवाय, रोजच्या धकाधकीच्या दैनंदिन जीवनापासून दूर जात, निसर्गाच्या सान्निध्यात राहून त्यांना मन:शांतीही मिळते.
गिर्यारोहणाच्या नावाखाली काहींकडून गैरप्रकार केले जात असल्याचे दुर्दैवी चित्र एकीकडे असले, तरी दुसरीकडे गिर्यारोहण हा निव्वळ छंद न राहता अनेक संस्थांमार्फत गिर्यारोहणाबरोबरच गडकोट संवर्धनाचे मोलाचे कार्यही केले जाते आहे. गडकिल्ले, ऐतिहासिक स्थळांना भेटी दिल्यावर इतिहासाची गाथा सांगणार्या या स्थळांची आजची बिकट अवस्था बघून नुसतं हळहळत न बसता, स्वतः पुढाकार घेऊन अशा स्थळांची स्वच्छता करणे, माहितीपर व दिशादर्शक फलक लावणे, अशी अनेक संवर्धनाची कामे करण्यासाठी आजची तरुणाई झटताना दिसते.
शिवाय, हा
ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी आपण काय करू शकतो याविषयी जनजागृती करण्याचे कामही अनेक युवक करत आहेत. अशा गिर्यारोहणादरम्यान अनेक जाणकार वक्ते तरुणाईला या ऐतिहासिक स्थळांचे माहात्म्य सांगून ते जपण्याची जाणीव करून देतात. यातून अनेक तरुण इतिहास अभ्यासक तयार होतात. आपल्या पराक्रमी पूर्वजांविषयीच्या अभिमान व आदराच्या भावनेने इतिहासाच्या पाऊलखुणांचा धांडोळा घेताना दिसतात. तेथील पावित्र्य जपण्यासाठी अनेक जण प्रयत्न करताहेत. भग्नावस्थेत असल्या, तरी वर्षानुवर्षे ऊन, वारा, पाऊस आणि उपेक्षा झेलत आजही दिमाखात उभ्या असलेल्या आपल्या ऐतिहासिक वास्तू हा आपला राष्ट्रीय ठेवा आहे.
देदिप्यमान इतिहासाची साक्ष देत भविष्यासाठी प्रेरणा देणारा हा वारसा जपणे आणि तो पुढील पिढ्यांपर्यंत चांगल्या अवस्थेत सुखरूप पोहोचवणे हे युवा पिढीचे कर्तव्य आहे! अशा ऐतिहासिक स्थळी कचरा करणे, दगडांवर आपली नावे लिहिणे अशा गैरकृत्यांतून पवित्र स्थळांचे विद्रूपीकरण न करता तिथला प्रत्येक चिरा, प्रत्येक दगड जो वैभवशाली इतिहास आपल्याला सांगतोय तो ऐकूया! आपले हे वैभव जपण्यासाठी आपणही हातभार लावूया!!