जिल्ह्यात शेतकर्‍यांचा कल सोयाबीनऐवजी मक्याकडे

जिल्ह्यातील स्थिती; भावात घसारण अन् उत्पादन खर्चवाढीचा परिणाम

लासलगाव : समीर पठाण
मे महिन्यात झालेल्या पावसामुळे यंदा मक्याच्या पिकासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. सोयाबीनच्या तुलनेत मक्याचा उत्पादन खर्च कमी येतो, तसेच गेल्या वर्षी सोयाबीनच्या दरात आलेली घसरण व उत्पादनात घट झाल्याने शेतकर्‍यांनी यंदा मोठ्या प्रमाणात मक्याच्या पेरणीवर भर दिला आहे.
कृषितज्ज्ञांच्या मते, मक्याचा उत्पादन खर्च सोयाबीनपेक्षा 25-30 टक्क्यांनी कमी येतो. याशिवाय मक्यावर कीड-रोगांचा प्रादुर्भाव तुलनेने कमी होत असल्याने शेतकर्‍यांना उत्पादनात सातत्य मिळते. याशिवाय मक्यापासून कोंबडी खाद्य, स्टार्च, तेल, बायाइथेनॉल, गोड धान्य, मक्याचे पीठ, पॉपकॉर्न, जनावरांचे खाद्य आदी उपउत्पादने तयार केली जातात. त्यामुळे मागणी कायम राहते. नाशिक जिल्ह्यात ‘महाकर्णिका’, ‘राशी 4030’, ‘महासक्ती’, ‘एमएच 106’, ‘एमएच 102’ या मक्याच्या वाणांचे मोठ्या प्रमाणात पेरणी होते.
जिल्ह्यात निफाड, सिन्नर, येवला, देवळा, दिंडोरी या तालुक्यांमध्ये मक्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. दरम्यान, शेतकर्‍यांचे अनुभव, तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि उत्पादनातील स्थिरता यामुळे मका हे शाश्वत आर्थिक आधार देणारे पीक ठरत असल्याचे स्पष्ट होत आहे. यंदा पावसाळ्यात मक्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होऊन शेतकर्‍यांना चांगले उत्पन्न मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

मक्यासाठी घ्यावी लागणारी काळजी
जमिनीत योग्य नांगरणी व भरपूर ओलावा राखावा. पेरणीसाठी गुणवत्तापूर्ण बियाण्याचा वापर करावा. वेळेवर तणव्यवस्थापन करावे. लागवडीनंतर 25-30 दिवसांनी व त्यानंतर 50 दिवसांनी खतव्यवस्थापन करावे. तुषार सिंचनाचा वापर करणे फायदेशीर ठरते.

गेल्या वर्षी मक्याचे दर
गेल्या वर्षी नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये मक्याचे दर 1600 ते 2200 रुपये प्रतिक्विंटलदरम्यान राहिले. याचवेळी सोयाबीनचे दर 3500-4500 रुपये क्विंटल होते; परंतु उत्पादनात आलेल्या घटीमुळे सरासरी उत्पन्न कमी झाले आणि शेतकर्‍यांना आर्थिक फटका बसला.

या देशांत होते मक्याची निर्यात
बांगलादेश, नेपाळ, म्यानमार, व्हिएतनाम, श्रीलंका, मलेशिया, यूएई, ओमान या देशांमध्ये भारतातून मका निर्यात केला जातो.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *