बिबट्यांचा नागरी वस्तीत वावर वाढला

सकाळी 8 वाजताच गंगापूर कॅनॉलवर फेरी

पंचवटी : वार्ताहर
शहर परिसरालगतच्या बिबट्यांचा वावर आता नागरी वस्तीत वाढू लागला आहे. शुक्रवारी (दि. 4) सकाळी आठ वाजेच्या सुमारास गंगापूर कॅनॉलवर फडोळ मळ्याजवळ बिबट्या फेरी मारताना दिसल्यावर नागरिकांची चांगलीच भंबेरी उडाली होती.
दोन-तीन दिवसांपूर्वी बिबट्याने रामवाडी पुलाजवळील बेलेश्वर महादेव मंदिराच्या भागात दर्शन दिले. त्यानंतर गुरुवारी सायंकाळी मेरी परिसराच्या म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या परिसरात बिबट्याने दर्शन दिल्याचे समजले. त्यानंतर शुक्रवारी (दि. 4) सकाळी आठ वाजेच्या सुमारास गंगापूर कॅनॉलवरून फडोळ मळ्याजवळ अगदी डामडौलात चालताना दिसला. गंगापूर कॅनॉलवर सकाळी पायी फिरणार्‍यांची संख्या मोठी असते. तसेच या परिसरात फडोळ मळ्याची वस्ती आहे.
याच रस्त्यावरून गंगापूर रोडकडे शाळा, महाविद्यालय असल्याने पालक आपल्या मुलांना सोडायला जात असतात. त्यातच बिबट्याने दर्शन दिल्याने नागरिकांचे धाबे दणाणले होते.
गंगापूर कॅनॉलच्या दोन्ही बाजूला झाडेझुडपे वाढली आहेत. याच भागात, तसेच डुकरांचासुद्धा सुळसुळाट वाढला असल्याने शेतीचे नुकसान होत आहे.
फडोळ वस्तीतील अनेक विद्यार्थी शाळेत येत-जात असतात. त्यातच बिबट्याने अशा प्रकारे सकाळीच दर्शन दिल्याने परिसरातील शेतकरी, फिरणारे नागरिक भयभीत झाले आहेत. फडोळ वस्तीवरील शेतकर्‍यांनी बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी
केली आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *