उपमुख्यमंत्र्यांच्या घोषणेमुळे राजकीय वादंग
मुंबई ः
राज्यात मराठी भाषेच्या मुद्द्यावरून वातावरण तापले असताना राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यातील कोंढवा कन्व्हेंशन सेंटरमधील कार्यक्रमात भाषणाच्या शेवटी जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात असे म्हटले. त्यांच्या या गुजरातच्या उल्लेखावरून प्रचंड राजकीय वादंग निर्माण झाले आहे.
या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री अमित शाह उपस्थित होते. यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी नेहमीप्रमाणे अमित शाह यांच्या कौतुकाचे पाल्हाळ लावले होते. शाह यांचे कौतुक करताना त्यांनी अनेक विशेषणे आणि उपमांचा वापर केला. एकनाथ शिंदे यांनी भाषणाच्या शेवटी जय हिंद, जय महाराष्ट्र असे म्हटले. त्यानंतर एकनाथ शिंदे यांना काहीतरी आठवले आणि त्यांनी पुन्हा माइकपाशी येऊन जय गुजरात, असे म्हटले. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आणि आश्चर्याची भावना व्यक्त केली. महाराष्ट्रात होणार्या मोठ्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिंदे यांच्या या घोषणेला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे.
‘जय गुजरात’ ही घोषणा महाराष्ट्राच्या भूमीत दिली गेल्याने यापुढे राजकीय चर्चांना अधिक उधाण येण्याची शक्यता आहे. या कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भाषणे झाली. फडणवीस आणि शाह यांंनी आपल्या भाषणात थोरल्या /-…5
मुख्यमंत्र्यांनी दिला पवारांचा दाखला
यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, की यापूर्वी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे उद्घाटन करताना शरद पवार जय महाराष्ट्र, जय कर्नाटक म्हणाले होते. याचा अर्थ त्यांचे कर्नाटकावर जास्त प्रेम आहे आणि महाराष्ट्रावर कमी प्रेम आहे, असे समजायचे का? आपण ज्यांच्या कार्यक्रमात जातो त्यावेळी त्यासंदर्भात आपण बोलत असतो. आता गुजराती समाजाच्या कार्यक्रमात गेल्यानंतर जय गुजरात म्हटले. याचा अर्थ एकनाथ शिंदेंचं गुजरातवर जास्त प्रेम आहे आणि मराठीवर कमी इतका संकुचित विचार मराठी माणसाला शोभत नाही. एवढा संकुचित विचार कोणी करत असेल तर चुकीचं आहे.
‘केम छो’ एकनाथ शिंदेसाहेब
एकनाथ शिंदेंच्या जय गुजरातच्या घोषणेनंतर राज्यातील विरोधकांनी त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आता शिंदे साहेबांसोबत कसं बोलायचं? केम छो एकनाथ शिंदेसाहेब, असं म्हणत डिवचले आहे. विनाशकाले विपरीत बुद्धी… शिवसेना मराठी माणसासाठी उभी केली होती. या सगळ्यातून एकच म्हणावे वाटतं, विनाशकाले विपरीत बुद्धी, असेही ते म्हणाले.
शिंदे गटाकडून ठाकरेंचा व्हिडीओ शेअर
दरम्यान, विरोधकांच्या टीकेनंतर शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे यांनीदेखील उद्धव ठाकरेंचा एक व्हिडीओ ट्विट केला. यात उद्धव ठाकरे हे आप आगे चलो हम साथ है, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात म्हणत असल्याचे दिसत आहे. अनेक जण हे विसरले असतील म्हणून परत लक्षात आणून द्यायचा हा प्रयत्न, असे म्हणत शीतल म्हात्रे यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला.