वीज वितरणकडून स्मार्ट मीटरच्या माध्यमातून लूट

दहमहा वीजबिलात दुप्पट, तिप्पट वाढ; ग्राहकांमध्ये संतापाची भावना

निफाड : तालुका प्रतिनिधी
वीज वितरण कंपनीकडून गावात असणार्‍या विद्युत तारा काढून त्याऐवजी केबल टाकण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहेत, तर ज्या गावात अशी कामे झाली त्या ठिकाणी वीज वितरण कंपनीकडून ग्राहकांकडे असलेले जुने मीटर काढून नवीन स्मार्ट मीटर बसविण्यात येत आहे. मात्र, या नवीन मीटरचे दरमहा येणारे बिल हे पूर्वीच्या मीटरपेक्षा दुप्पट ते तिप्पट येत असल्याने वीज वितरण कंपनीकडून ग्राहकांची ही दिवसाढवळ्या लूट सुरू असल्याचे ग्राहकांच्या निदर्शनास येऊ लागल्याने वीज वितरण कंपनीविरोधात संतापाची भावना वाढीस लागली आहे.
वीजचोरीला आळा घालण्यासाठी गावागावांत वीज वितरण कंपनीकडून विद्युत तारा काढून त्याऐवजी केबल टाकली जात आहे.
साहजिकच यापूर्वी विद्युत तारेवर टाकण्यात येणारे आकडे (चोरून वीजपुरवठा ) आता टाकता येणार नाही. साहजिकच वीजचोरीच्या प्रमाणात घट होईल. वीज कंपनीचा हा उद्देश सफल होत आहे. ही भूषणावह बाब आहे. मात्र, ज्या ज्या गावात केबल टाकण्याचे काम पूर्ण झाले, तेथे वीज कंपनीकडून बंद मीटरच्या नावाखाली म्हणा की, अद्ययावत मीटर रीडिंग घेण्यासाठी म्हणा. परंतु, मीटर बदलण्याची धडक कारवाई जोरात सुरू आहे. अनेक गावांमध्ये ही कारवाही पूर्णदेखील झाली आहे. प्रारंभी हे मीटर बसविण्याला ग्राहकांनी विरोध केला होता.
त्यामुळे ज्यांचे मीटर नादुरुस्त आहे, तेथे असे मीटर बसवत या स्मार्ट मीटरचा श्रीगणेशा करण्यात आला आणि आता हळूहळू सर्वांचेच मीटर बदलले जात आहे. ज्यांना ज्यांना या मीटरचे प्रथम बिले आले आहे, ते पाहता ग्राहकांना चक्कर येऊ लागली आहे. साहजिकच त्याची चर्चादेखील होऊ लागली आहे.
या स्मार्ट मीटरचे महिनाभराचे बिल हजारात तर काहींना दीड -दोन हजारांत येऊ लागल्याने
भीक नको पण कुत्रं आवर, असे म्हणण्याची वेळ वीजग्राहकांवर आली आहे. सधन शेतकरी अथवा उच्चवर्णीय लोकांचे ठीक आहे. मात्र सर्वसामान्य, शेतमजूर इतके बिल कसे भरणार. रॉकेलचे दिवे घराघरांत पेटणार की काय, अशी परिस्थिती होऊ लागली आहे.
फरक इतकाच की, आता रॉकेल मिळत नसल्याने त्याऐवजी डिझेल वापरले जाईल किंवा विजेला पर्याय म्हणून सोलरकडे ग्राहकांचा कल वाढू शकेल. त्यामुळे वीज वितरणचा ग्राहक कमी होऊन त्यांची अवस्था दूरसंचार कंपनीसारखी न होवो म्हणजे मिळवली. त्यामुळे ग्राहक टिकवून ठेवण्यासाठी वीज वितरण कंपनीने ग्राहकहिताला प्राधान्य देत माफक दरात आणि सुरळीत वीजपुरवठा करण्याबरोबरच कर्मचार्‍यांना ग्राहकांशी सौजन्याने बोलण्याचे, वागण्याचे प्रशिक्षण द्यावे.
तसेच विजेसंबंधी असणार्‍या समस्या तत्काळ सोडविण्याची ताकीद देण्यात यावी. कारण वीजबिल थकले तर संबंधित ग्राहकाचे वीजकनेक्शन तत्काळ कट केले जाते. अगदी तशीच तत्परता वीजपुरवठा सुरळीत करण्यात का दाखविली जात
नाही.

सरकारला सर्वसामान्य जनतेशी काही देणेघेणे नाही, तर उद्योगपतींचे घर भरण्यासाठी हा सारा खटाटोप सुरू आहे. त्यातच वीज वितरण कंपनी वापरणार्‍या प्रतियुनिट दराप्रमाणे वीजबिल देणे गरजेचे असताना, त्यात वीजगळती, इंधन अधिभार, तसेच थकबाकी नसताना निव्वळ थकबाकी अन् त्यावरील व्याज. असे नानाविध कर लावून ग्राहकांना लुटण्याचे धोरण अवलंबवत आहे.त्यामुळे इतर सर्व कर कमी करून वापरलेल्या युनिटचेच बिल देण्यात यावे.
– शशिकांत शिंदे, वीजग्राहक

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *