ओझर विमानसेवेला भरघोस प्रतिसाद

मे महिन्यात 42 टक्क्यांची विक्रमी वाढ

नाशिक : प्रतिनिधी
नाशिकच्या ओझर विमानतळावरून प्रवास करणार्‍या प्रवाशांची संख्या विक्रमी पातळीवर पोहोचली असून, यंदाच्या मे महिन्यात एकूण 37,509 प्रवाशांनी या विमानसेवेचा लाभ घेतला. ही संख्या गेल्या वर्षी मे महिन्याच्या तुलनेत तब्बल 42 टक्क्यांनी वाढली आहे, अशी माहिती निमाच्या एव्हिएशन कमिटीचे चेअरमन मनीष रावल यांनी दिली.
ओझर विमानतळावर सध्या इंडिगो कंपनीच्या माध्यमातून दिल्ली, अहमदाबाद, गोवा, हैदराबाद, बंगळुरू आणि नागपूर या शहरांसाठी नियमित सेवा सुरू आहे. विशेष म्हणजे, नागपूर मार्गाला गेल्या वर्षभरात उत्तम प्रतिसाद मिळाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

कुंभमेळा आणि विमानतळाचा विस्तार
आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ओझर विमानतळाच्या सुविधांमध्ये मोठा विस्तार करण्यात येणार आहे. यामध्ये मुख्य धावपट्टीसह एक पर्यायी धावपट्टी तयार केली जात आहे. याशिवाय, पायाभूत सुविधांचा दर्जा उंचावण्याचे काम सुरू आहे. यामुळे कुंभमेळ्यादरम्यान नाशिककडे देशभरातून आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरूनही मोठ्या प्रमाणात प्रवासी आकर्षित होतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. ओझर विमानतळाच्या विकासामुळे नाशिकच्या विकासाला चालना मिळणार आहे.

विमानसेवेच्या वाढत्या संधी
विमानसेवेतील वाढीचा कल लक्षात घेता नजीकच्या काळात नाशिकहून नवीन शहरांसाठी सेवा सुरू होण्याची शक्यता आहे. यामुळे नाशिकचे देशातील इतर प्रमुख शहरांशी हवाई संपर्क अधिक बळकट होणार आहे.

उडान योजनेनंतरही टिकवली सेवा
केंद्र सरकारची उडान योजना संपल्यानंतरदेखील नाशिकच्या विमानसेवेला कोणतीही बाधा झाली नाही. उलट प्रवाशांची संख्या सातत्याने वाढत आहे. याचे श्रेय स्थानिक प्रशासन, विमान कंपन्या आणि प्रवाशांच्या सकारात्मक प्रतिसादाला दिले जात आहे.

महत्त्वाचे आकडे
मे 2024 26,450 प्रवासी
मे 2025 37,509 प्रवासी
वाढ 42%

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *