किचन ट्रॉलीच्या कंपनीला भीषण आग

सिडको : विशेष प्रतिनिधी
अंबड गावानजीक असलेल्या देवकीनंदन गोशाळा ते अंबड गाव दरम्यानच्या मुख्य रस्त्यावर असलेल्या फडोळ मळा येथील किचन ट्रॉलीचे साहित्य बनवणार्‍या कंपनीला सोमवारी सायंकाळच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत लाखो रुपयांचा माल जळून खाक झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे.
दरम्यान, अग्निशमन दलाच्या पथकाने तातडीने घटनास्थळी दाखल होत आग आटोक्यात आणली. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, फडोळ मळा येथे असलेल्या श्रीष्टी किचन या कंपनीत सोमवारी संध्याकाळी साडेचारच्या सुमारास आग लागली. ही आग मोठ्या प्रमाणावर पसरल्याने आग विझवण्यासाठी अग्निशमन दलास तब्बल दोन तासांचे प्रयत्न करावे लागले. आग लागण्याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी प्राथमिक अंदाजानुसार शॉर्टसर्किटमुळे ही घटना घडल्याचे समजते. या आगीत सुमारे पाच ते सहा लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली.
आग कशामुळे लागली याबाबत अंबड पोलीस तपास करत आहेत. या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी नाशिक महापालिकेच्या नवीन नाशिक केंद्र, मुख्यालय, सातपूर व अंबड एमआयडीसी येथून चार अग्निशमन बंब घटनास्थळी पाठवण्यात आले होते.ही आग आटोक्यात आणण्यासाठी प्रभारी एम. एन. मधे, लीडिंग फायरमन एम. एन. शेख, ए. ए. पटेल, वाहनचालक एम. पी. अहिरे तसेच ट्रेनी फायरमन संकेत पगारे, शुभम शेवाळे, तुषार पाटील यांच्या पथकाने सलग दोन तास शर्थीचे प्रयत्न केले. त्यांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *