सरदवाडी धरण ओव्हरफ्लो; भोजापूरच्या पूरचार्‍यांना सोडले पाणी

आठपैकी पाच धरणे भरली, पावसाची संततधार सुरू

सिन्नर : प्रतिनिधी
गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे सरदवाडी धरण ओव्हरफ्लो झाले आहे. हे धरण ओव्हरफ्लो झाल्यामुळे स्थानिक पाच गावांच्या पाणीपुरवठा योजनांना संजीवनी मिळाली आहे. गेल्या वेळेच्या तुलनेत धरण महिनाभर अगोदर भरल्याने स्थानिक शेतकर्‍यांनाही दिलासा मिळाला आहे.
सरदवाडी धरणावर जामगाव, पास्ते, लोणारवाडी, भाटवाडी, सरदवाडी या पाच गावांच्या स्थानिक पाणीपुरवठा योजना अवलंबून आहेत. धरण पूर्णक्षमतेने भरल्यामुळे या पाचही गावांची पाणीटंचाईतून मुक्तता झाली आहे.
दरम्यान, रविवारी उशिरा धरण ओव्हरफ्लो झाल्यानंतर सांडव्यावरून पाणी वाहून ते शिवनदीला जाऊन मिळाले. सिन्नर शहरातून वाहणारी सरस्वती नदी महिनाभर अगोदरच प्रवाहित झाली आहे. गेल्या महिन्यात कोनांबे धरण भरून देव नदीच्या प्रवाहातही कमालीची वाढ झाली आहे. त्यात आता कुंदेवाडी येथील संगमावर शिव नदीचे पाणी जाऊन मिळणार असल्याने देव नदीच्या प्रवाहात मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. साहजिकच वाढणार्‍या या पाण्यामुळे पूर्व भागातील कुंदेवाडी – सायाळे आणि खोपडी – मिरगाव या दोन्ही पुरचार्‍यांना आणखी बळकटी मिळाली आहे. त्यामुळे पूर्व भागातील गावांना पावसाचे प्रमाण अत्यल्प असले तरी दोन्ही पुरचार्‍यांमुळे संजीवनी मिळाली आहे.
भोजापूरसह पाच
पाझर तलाव ओव्हरफ्लो
मे महिन्यात झालेल्या दमदार पावसामुळे पश्चिम पट्ट्यातील धरणांमध्ये काही प्रमाणात पाण्याचा साठा झाला होता. ठाणगाव येथील उंबरदरी, बोरखिंड, कोनांबे ही धरणे गेल्या पंधरवड्यात ओव्हर फ्लो झाली. तर दोन दिवसांपूर्वी भोजापूर आणि सरदवाडी ही दोन्ही धरणेही पूर्णक्षमतेने भरली आहेत. त्यामुळे आता केवळ दातली
फुलेनगर आणि दुशिंगपूर या तीन बंधार्‍यांनाच पाण्याची प्रतीक्षा आहे. त्यातही कुंदेवाडी-सायाळे पूर चारीच्या माध्यमातून दातली आणि फुलेनगर बंधार्‍यात पाण्याची आवक सुरू झाली आहे. दुशिंगपूर बंधार्‍यात मात्र अंतर अधिक असल्याने भोजापूर आणि सायाळे पूरचारीचे पाणी पोहोचण्यास वेळ लागणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *