स्मार्ट सिटीच्या सिग्नल यंत्रणेचा फज्जा; वाहतुकीला फटका

शहरातील 12 ठिकाणचे सिग्नल बंद; वाहनधारकांचा होतोय गोंधळ

नाशिक : प्रतिनिधी
शहरातील 60 पैकी 40 सिग्नलची जबाबदारी स्वत:कडे घेणार्‍या स्मार्ट सिटीकडील बारा सिग्नल विविध कारणांनी नादुरुस्त होऊन बंद पडल्याने त्याचा वाहनधारकांना फटका बसतो आहे. दरम्यान, सिग्नल यंत्रणा नादुरुस्त असूनही त्याकडे स्मार्ट सिटी लक्ष देत नसल्याचे चित्र आहे. महापालिकेकडे वीस सिग्नलची जबाबदारी असून, ते सर्व सुरळीतपणे सुरू आहेत.
शहरातील महत्त्वाच्या 12 ठिकाणी सिग्नल यंत्रणा कार्यान्वित नसताना वाहतूक पोलिसांकडून संबंधित ठिकाणी थांबून वाहतुकीला दिशा देण्याचे काम करणे अपेक्षित असताना, अनेक चौकांमध्ये सिग्नल तर बंदच, परंतु वाहतूक पोलीसही गायब असल्याचे दिसून येते. त्यामुळे अशा चौकांत मनमानीपणे वाहतुकीचे नियम तोडून धोकादायकपणे मार्गक्रमण केले जात आहे. यामुळे अनेकदा वाहतूक कोंडी होऊन अपघात घडत आहेत.
वाहतूक नियंत्रित ठेवण्यासाठी आणि वाहनधारकांना शिस्त लावण्यासाठी शहरात एकूण साठ सिग्नल बसवण्यात आले आहेत. 12 सिग्नल सध्या बंद अवस्थेत असून, त्यामुळे वाहतुकीचा त्या-त्या मार्गावर खोळंबा होत आहे. सध्या सुरू असलेल्या सिग्नलमुळे केवळ वाहने अडवून ठेवणे आणि सोडणे यापेक्षा अधिक काहीच होत नाही. अनेकदा वर्दळीच्या ठिकाणी असलेले सिग्नल अचानक बंद पडतात. अशावेळी वाहतूक पोलीसही पुरेसे नसतात. त्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी होते.
शहरात एकूण 60 सिग्नल असून, 20 महापालिकेकडे, तर स्मार्ट सिटीकडे 40 सिग्नल आहेत. स्मार्ट सिटी दोन वर्षांपासून 40 सिग्नलची दुरुस्ती करत आहे. त्यांचा मेन्टेनन्स बघत आहे. परंतु काही दिवसांपासून स्मार्ट सिटीच्या ताब्यातील तब्बल 12 सिग्नल अजूनही बंद अवस्थेत आहेत. कुठे रस्त्याचे काम, तर कुठे केबलचे काम, तर कुठे फायबर ऑप्टिकलचे काम सुरू असल्याने सिग्नल यंत्रणेला त्याचा फटका बसत आहे.
जुना आडगाव नाका परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहतुकीची वर्दळ सुरू असते. विशेष म्हणजे, वाहतूक पोलिसांच्या अनुपस्थितीमुळे सर्रास नियम तोडले जातात.
त्यामुळे वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सतर्क राहावे, अशी मागणी वाढू लागली आहे. मुंबई -आग्रा महामार्गावरील बळी मंदिर हा परिसर नेहमीच गजबजलेला असतो. त्याठिकाणी दुतर्फा वाहतुकीची कोंडी होतेे. तसेच अमृतधाम या परिसरातही वाहतूक कोंडी झाली तर वाहनांच्या दूरवर रांगा लागतात. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी सिग्नल बसवावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

अठ्ठावीस ठिकाणी एआय सिग्नलचा प्रस्ताव

शहरातील वाहतूक कोंडी पाहता स्मार्ट सिटीने नव्याने 28 ठिकाणी एआय सिग्नल यंत्रणा बसवण्याचा निर्णय घेतला आहे. द्वारकासह इतर ठिकाणांचा समावेश आहे. मात्र, आधीचेच सिग्नल बंद असताना त्याकडे दुर्लक्ष करून स्मार्ट सिटीकडून एआयसाठी काम करत असल्याचे विरोधाभासी चित्र आहे.

येथील सिग्नल बंद

नांदूर नाका, मिर्ची सिग्नल, मखमलाबाद नाका, सुविधा हॉटेल, प्रसाद सर्कल, विद्या विकास सर्कल, मुंबई नाका, सिन्नर फाटा, महिंद्रा सर्कल, राऊ हॉटेल, मेहेर सिग्नल, वडाळा नाका हे सिग्नल विविध कारणांनी बंद झाले आहेत. त्यामुळे वाहनचालकांसह पादचार्‍यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *