आ. देवयानी फरांदे यांच्या पाठपुराव्याला यश
नाशिक ः प्रतिनिधी
शहरातील धार्मिक स्थळांवर लावण्यात आलेल्या अनधिकृत भोंग्यांविरोधात नाशिक पोलिसांनी निर्णायक पावले उचलत मोठी कारवाई केली आहे. एकूण 138 भोंगे (लाउडस्पीकर) शांततेत उतरवण्यात आले. ही कारवाई भाजपच्या आमदार देवयानी फरांदे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर करण्यात आली आहे.
विधानसभेत आमदार फरांदे यांनी ध्वनिप्रदूषणाच्या मुद्द्यावर लक्षवेधी सूचना दिली होती. त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचा दाखला देत स्पष्ट केले की, भोंगा (लाउडस्पीकर) कोणत्याही धर्माचा भाग नाही आणि सार्वजनिक ठिकाणी अनधिकृतपणे भोंग्यांचा वापर न्यायालयाने अमान्य केला आहे. अजान ही प्रार्थना वैयक्तिक श्रद्धेचा विषय असू शकतो. मात्र, त्यासाठी भोंग्याचा वापर बेकायदेशीर ठरवण्यात आला आहे, असे आ. फरांदे यांनी सभागृहात सांगितले.
राज्य सरकारनेदेखील या विषयावर कठोर भूमिका घेतली असून, यापुढे कोणत्याही धार्मिक किंवा सार्वजनिक कार्यक्रमात भोंग्यांसाठी पोलिसांची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. यासाठी स्थानिक पोलीस निरीक्षक जबाबदार राहणार असून, नियमांचे उल्लंघन झाल्यास त्यांच्यावरही कारवाई
होणार आहे.
आमदार फरांदे यांनी यासंदर्भात नाशिक पोलीस आयुक्तांना पत्र देऊन कारवाईला विलंब होत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली होती. त्यांच्या मागणीला प्रतिसाद देत, अखेर नाशिक पोलिसांनी पुढाकार घेत पाच पोलीस ठाणे हद्दीत भोंगे उतरवण्याची मोठी कारवाई शांततेत आणि सामंजस्याने पार पाडली. नाशिक शहरातील भोंगे काढून घेतल्यामुळे नागरिकांना शांततेचा अनुभव मिळत असून, या कारवाईबाबत समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
या भागातील काढले भोंगे
भद्रकाली पोलीस ठाणे हद्द 72
उपनगर पोलीस ठाणे हद्द 36
इंदिरानगर पोलीस ठाणे हद्द 15
मुंबई नाका पोलीस ठाणे हद्द 13
गंगापूर पोलीस ठाणे हद्द 02
भोंगा कोणत्याही धर्माचा भाग नाही आणि सार्वजनिक ठिकाणी अनधिकृतपणे भोंग्यांचा वापर न्यायालयाने अमान्य केला आहे. अजान ही प्रार्थना वैयक्तिक श्रद्धेचा विषय असू शकतो. मात्र, त्यासाठी भोंग्याचा वापर बेकायदेशीर ठरवण्यात आला आहे.
– देवयानी फरांदे, आमदार, नाशिक मध्य