सणांचा, व्रतवैकल्यांचा महिना श्रावण

श्रावण महिना शुक्रवारपासून (दि. 25) सुरू झाला. हिंदू धर्मात श्रावणाचे महत्त्व अनन्यसाधारण असे आहे. श्रावणातील सोमवार हिंदू धर्मात पवित्र मानला जातो. या दिवशी महादेवाची पूजा केली जाते. तसे श्रावणातील प्रत्येक वारी कोणत्या ना कोणत्या देवतेची पूजा व व्रत करण्याची हिंदू व जैन धर्माची परंपरा आहे. श्रावण महिन्याला सणांचा महिना म्हटले जाते. कारण श्रावणातच सर्वार्ंत जास्त सण येतात. या महिन्यात व्रत-वैकल्याची रेलचेल असते.
या महिन्यात नागपंचमी, रक्षाबंधन, नारळी पौर्णिमा, श्रीकृष्ण जन्माष्टमी, गोपाळकाला, मंगळागौर, बैलपोळा हे सण येतात. त्यानंतर येणारे गौरी-गणपतीही याच महिन्यात खुणावत असतात. नागपंचमीपासून दसरा-दिवाळीपर्यंत सगळ्या हव्याहव्याशा सणांची सुरुवात याच महिन्यापासून होते. सणांच्या दिवशी गोडाधोडाचा बेत घराघरांत असतो. श्रावणातील प्रत्येक दिवस सण होऊन जातो.
अशा आनंदी वातावरणामुळे असेल कदाचित, पण श्रावणात मनाच्या सांदी कोपर्‍यात उत्साहाचे नवे ऋतू फुलत असतात. बहुतेक सगळ्या सणांमध्ये आणि अंगीकारल्या जाणार्‍या व्रत-वैकल्यांमधून संकटातून निर्भीडपणे आणि यशस्वीपणे बाहेर येण्यासाठी शक्ती मिळविण्यासाठी प्रेरणा मिळते. संसारातील सर्व सुख-
दुःखाचा सारीपाट मांडला असताना मन मोकळं करून सख्यांना समजून घेण्याचे हक्काचे क्षण हा महिना देऊन जातो. श्रावण महिना केवळ हिंदूंसाठीच नव्हे, तर मुस्लिम आणि पारशी बांधवांसाठीही पवित्र महिना मानला जातो.
कारण याच महिन्यात मुस्लिमांची बकरी ईद व पारशी बांधवांची पतेती हे सण येतात. त्यामुळे हिंदूंप्रमाणेच जैन, मुस्लिम आणि पारशी बांधव श्रावणाची आतुरतेने वाट पाहत असतात. मुस्लिम व पारशी बांधवदेखील त्यांचे सण उत्साहात आणि जल्लोषात साजरे करतात. श्रावणात निसर्गाला उधाण आलेले असते.
आषाढात झालेल्या पावसाने सर्वत्र हिरवळ दाटलेली असते. निसर्ग आषाढसरी पिऊन हिरवे गालिचे पसरून बहरलेला असतो. हा हिरवा गालिचा पाहूनच
हिरवे हिरवे गार गालिचे
हरित तृणाच्या मखमालीवर….
ही कविता बालकवींना सुचली असावी. श्रावणात सगळीकडे वसुंधरेवर श्रावणाच्या धारा बरसत असतात. श्रावणाच्या धारा बरसत असल्याने निसर्गसौंदर्य तृप्तीचा हुंकार देत असतो. निसर्गाचे बहरलेले सौंदर्य पाहताच हसरा, नाचरा, लाजरा, सुंदर साजिरा श्रावण आला या ओळी गुणगुणावशा वाटतात. श्रावण म्हणजे चैतन्य.. श्रावण म्हणजे उत्साह…
श्रावण मासी हर्ष मानसी
हिरवळ दाटे चोहिकडे
क्षणात येते सरसर शिरवे
क्षणात फिरून ऊन पडे
या कवितेत बालकवींनी श्रावणाचे चित्रण यथार्थपणे मांडले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *