कांद्याचे भाव गडगडणार

कांदा उत्पादकांवर ओढवणार आर्थिक संकट

कांद्याचे भाव गडगडणार

लासलगाव :- समीर पठाण

गेल्या काही दिवसांपासून कांद्याला अपेक्षित आणि समाधानकारक दर मिळत नसल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर दिसून येत आहे तसेच कांद्याच्या मागणीत झालेली घट आणि नाफेड व एनसीसीएफ या संस्थांना कांदा खरेदीत मिळालेला थंड प्रतिसाद व बांगलादेशने कांदा निर्यातीबाबत घेतलेले निर्णय या सगळ्यांचा परिणाम हा कांद्याच्या बाजारभाव घसरणीवर होत आहे त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी कमालीचे अस्वस्थ झाल्याचे चित्र आहे.

त्यातल्या त्यात आता दक्षिण भारतातील व त्यासोबत महाराष्ट्र,मध्यप्रदेश आणि एनसीसीएफ व नाफेडचा कांदा एकाच वेळी बाजारात येणार असल्यामुळे बफर स्टॉक उपलब्ध होणार आहे.अशाप्रकारे कांदा जर बाजारात आला तर येणाऱ्या कालावधीत कांद्याच्या दरात अजून घसरण होण्याचा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला असल्याने यावर उपाय म्हणून कांद्यावरील प्रोत्साहन राशी वाढवण्यासाठी सरकारवर दबाव वाढवण्यात येत आहे.

सध्या थोड्या प्रमाणात का होईना दक्षिणेतील कांदा बाजारामध्ये येऊ लागला असून काही दिवसात संपूर्ण बाजारपेठ तिकडचा कांदा काबीज करेल की काय अशी परिस्थिती असल्यामुळे महाराष्ट्राच्या कांद्याला तिकडे मागणी राहणार नाही व त्यामुळे आपल्याकडील कांद्याचे भाव अजून कमी होण्याची शक्यता आहे.

सध्या कांद्याला सरासरी 1300 ते 1400 रुपयांचा दर मिळत आहे व हा दर अजून कमी झाला तर शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवण्याची शक्यता आहे.त्यातच अनेक शेतकऱ्यांनी भाववाढ होईल या आशेने कांदा चाळीमध्ये साठवून ठेवलेला आहे.पण येणाऱ्या काळात दक्षिणेकडील व महाराष्ट्रातील तसेच एनसीसीएफ व नाफेडचा 3 लाख टन कांदा जर एकाच वेळी बाजारात आला तर कांद्याचे दर अजून घसरण्याची शक्यता वर्तवली जात आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *