दक्षिण भारत, मध्य प्रदेशातील कांद्याच्या आवकेने भाव गडगडण्याची शक्यता
लासलगाव : समीर पठाण
गेल्या काही दिवसांपासून कांद्याला अपेक्षित व समाधानकारक बाजारभाव मिळत नसल्याने कांदा उत्पादक शेतकर्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. कांद्याच्या मागणीत झालेली घट आणि
नाफेड, एनसीसीएफ या संस्थांना कांदा खरेदीत मिळालेला थंड प्रतिसाद व बांगलादेशने कांदा निर्यातीबाबत घेतलेले निर्णय, या सर्वांंचा परिणाम कांद्याच्या बाजारभाव घसरणीवर होत आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी कमालीचे अस्वस्थ झाल्याचे
चित्र आहे.
आता दक्षिण भारतातील व महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि एनसीसीएफ,
नाफेडचा कांदा एकाच वेळी बाजारात येणार असल्याने बफर स्टॉक उपलब्ध होईल. अशा प्रकारे कांदा जर बाजारात आला तर येणार्या कालावधीत कांद्याच्या दरात अजून घसरण होण्याचा अंदाज जाणकारांनी व्यक्त केल्याने यावर उपाय म्हणून कांद्यावरील प्रोत्साहन राशी वाढविण्यासाठी सरकारवर दबाव वाढविण्यात येत आहे.
सध्या थोड्या प्रमाणात का होईना दक्षिणेतील कांदा बाजारात येऊ लागला असून, काही दिवसांत संपूर्ण बाजारपेठ तिकडचा कांदा काबीज करेल की काय, अशी परिस्थिती असल्याने महाराष्ट्राच्या कांद्याला तिकडे मागणी राहणार नाही. त्यामुळे आपल्याकडील कांद्याचे भाव अजून कमी होण्याची शक्यता आहे. सध्या कांद्याला सरासरी 1,300 ते 1,400 रुपयांचा दर मिळत आहे. हा दर अजून कमी झाला तर शेतकर्यांवर आर्थिक संकट ओढावण्याची शक्यता आहे. त्यातच अनेक शेतकर्यांनी भाववाढ होईल, या आशेने चाळीत कांदा साठवून ठेवलेला आहे. पण येणार्या काळात दक्षिणेकडील व महाराष्ट्रातील तसेच एनसीसीएफ व नाफेडचा तीन लाख टन कांदा जर एकाच वेळी बाजारात आला तर कांद्याचे दर आणखी घसरण्याची शक्यता वर्तवली
जात आहे.