अशोकनगरमध्ये १६ वर्षीय  मुलाचा संशयास्पद मृत्यू, परिसरात खळबळ

अशोकनगरमध्ये १६ वर्षीय  मुलाचा

संशयास्पद मृत्यू, परिसरात खळबळ

सिडको/ सातपूर: प्रतिनिधी

: सातपूरच्या अशोकनगर परिसरात एका १६ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना घडली असून, या घटनेने परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मृतचे नाव यशराज तुकाराम गांगुर्डे (वय १६, रा. पवार संकुल, अशोकनगर) असे आहे. तो मॉडर्न माध्यमिक विद्यालयात शिक्षण घेत होता.

शनिवारी २ ऑगस्ट रोजी सायंकाळच्या सुमारास यशराज आपल्या मित्रासोबत अशोकनगर येथील राज्य कर्मचारी वसाहतीजवळील अंबिका स्विट नजीक असलेल्या गार्डनजवळ असलेल्या खासगी शिकवणी वर्गाकडे जात असताना अचानक खाली कोसळला. त्याच्या डोक्याला गंभीर इजा झाल्याने तातडीने त्याला नाशिकच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले.

या घटनेनंतर परिसरात अनेक तर्कवितर्क सुरू झाले असून काही स्थानिक नागरिकांनी सांगितले की, यशराज आणि त्याच्या मित्रामध्ये किरकोळ वाद झाला होता व त्यातच झालेल्या धक्काबुक्कीमुळे त्याच्या डोक्याला मार लागून मृत्यू झाला असावा. तथापि, याबाबत कोणतीही अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही.

सातपूर पोलीस ठाण्याचे अधिकारी या प्रकरणाचा तपास करत असून, घटनेचे सीसीटीव्ही फुटेज मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्या आधारे नेमकी घटना कशी घडली याचा तपशील समोर येण्याची शक्यता आहे.

या दुर्दैवी घटनेने गांगुर्डे कुटुंबावर शोककळा पसरली असून, यशराजच्या पश्चात त्याची आई आणि मोठा भाऊ असा परिवार आहे. घटनेमागील नेमके कारण समजण्यासाठी सर्वत्र उत्सुकता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *