तब्बल सव्वा दोन लाखांची लाच घेताना दोन अभियंते जाळ्यात
तब्बल सव्वा दोन लाखांची लाच घेताना दोन अभियंते जाळ्यात
नाशिक/दिंडोरी: प्रतिनिधी
पाणीपुरवठा योजनेचे मंजूर केलेल्या बिलाच्या मोबदल्यात बक्षीस आणि प्रलंबित बिल मंजूर करण्याच्या मोबदल्यात दोन लाख 16 हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने दिंडोरी येथील पाणी पुरवठा योजनेच्या उप अभियंता आणि कनिष्ठ अभियंता यांना रंगेहाथ पकडले. दिंडोरी येथे ही कारवाई करण्यात आली. उपअभियंता
योगेश नारायण घारे, वय44,रा.601.तिरुमाला भूमिका बी विंग, द्वारका, कनिष्ठ अभियंता मनीष कमलाकर जाधव,29. रा.कुंज विहार सोसायटी हिरावाडी अशी लाचखोरांची नावे आहेत. तक्रारदार हे शासकीय ठेकेदार असून, त्यांनी सावरपाडा तालुका दिंडोरी येथे जलजीवन मिशन पाणीपुरवठा योजनेअंतर्गत शिवार पाडा येथील यापूर्वी केलेल्या कामाचे बक्षीस स्वरूपात तसेच सद्याच्या प्रलंबित असलेल्या कामाचे बिल मंजूर करण्यासाठी 2 लाख 16 हजार रुपयांची लाच मागितली होती. उप अभियंता यांना लाचेची रक्कम स्वीकारताना सापळा अधिकारी अमोल वॉलझाडे, स्वप्नील राजपूत, हवालदार संदीप हादंगे,सुरेश चव्हाण, किरण धुळे, परशुराम जाधव यांच्या पथकाने रंगेहाथ पकडले. लाच खोर अभियंता यांच्या घराची
झडती घेण्यात आली. ही कारवाई पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर अधीक्षक माधव रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.