पारंपरिक मंगळागौर पूजेच्या उत्सवाला आधुनिकतेची जोड

नाशिक : पूर्वा इंगळे
श्रावण महिन्यात मंगळागौरीचे पूजन करण्यात येते. पारंपरिक उत्सव भक्तिभावाने आणि सांस्कृतिकदृष्ट्या साजरा करण्यात येतो. विवाहित महिलांनी त्यांच्या पतीच्या दीर्घायुष्य आणि कुटुंबातील सुख-समृद्धीसाठी मंगळागौरीची पूजा केली जाते.
श्रावण महिन्यात विविध सण-उत्सवांची रेलचेल असते. त्यामुळे सर्वत्र उत्साह व आनंदाचे वातावरण असते. श्रावणात प्रत्येक दिवसाला विशिष्ट महत्त्व आहे. श्रावणातील प्रत्येक मंगळवारी मंगळागौर साजरी केली जाते. हे एक व्रत आहे.
नवविवाहित महिलेने लग्नानंतर पहिली पाच वर्षे मंगळागौर पुजायची असते. पती-पत्नीमधील प्रेम व निष्ठेचा आदर्श म्हणून शिव-पार्वती या दाम्पत्याकडे पाहिले जाते. मंगळागौराच्या दिवशी अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीची चौरंगावर स्थापना केली जाते. त्यानंतर गणपती पूजन करून षोडशोपचारे पूजा केली जाते. काही ठिकाणी देवीला कणकेचे अलंकार वाहण्याची पद्धत आहे. नंतर देवीची पूजा करून देवीला विविध पत्री,
फुले वाहावीत. नंतर तांदूळ, पांढरे तीळ, जिरे, मुगाची डाळ आदी धान्ये मुठीने अर्पण केली जातात. यावेळी मंगळागौरीच्या कहाणीचे वाचन केले जाते. देवीला विविध पंचपक्वान्नाचा नैवेद्य दाखवून कणकेच्या दिव्यांनी ओवाळून आरती केली जाते. त्यानंतर रात्री जागरण केले जाते.

विविध प्रकारचे खेळ

श्रावणात नवविवाहितेच्या घरी आयोजित होणारे मंगळागौरीचे खेळ हे फक्त करमणूक नसून एक प्रकारचे कौटुंबिक आणि सांस्कृतिक संस्कार मानले जातात. झिम्मा, विविध प्रकारच्या
फुगड्या, वटवाघूळ, तवा, बस, पिंगरी, वाकडी, पांगोट्या, लाट बाई लाट, टिपर्‍या, फोडी, गोफ, करवंटी, झिम्मा, सवतीचं भांडण, सासू- सुनेचा संवाद, अशा काही भरपूर प्रकारचे पारंपरिक खेळ खेळले जातात. सांस्कृतिक एकतेचे आणि परंपरेचे जतन करणारे हे खेळ महिलांमध्ये आनंद व उत्साह निर्माण करतात. काही ठिकाणी संगीत व नृत्यासह सांस्कृतिक सादरीकरणदेखील करतात. मंगळागौर पूजा ही स्त्री सशक्तीकरणाचे व सांस्कृतिक जाणिवेचे प्रतीक ठरत असून, आधुनिक काळातही या सणाचे महत्त्व वाढत आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *