अंबासन विद्यालयातील प्रेरणादायी उपक्रम
जायखेडा : प्रतिनिधी
भारतीय संस्कृतीत रक्षाबंधन हा सण भाऊ-बहीणीच्या प्रेमाचे प्रतीक मानला जातो. या दिवशी बहिण भावाच्या मनगटावर राखी बांधून त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. परंतु यंदा अंबासन येथील मविप्रच्या नूतन विद्यालयातील विद्यार्थिनींनी रक्षाबंधनाच्या सणाला एक नवे परिमाण देत, झाडांना राख्या बांधत ‘वृक्षबंधना’चा एक आगळावेगळा आणि प्रेरणादायी उपक्रम राबवला.
या उपक्रमात शाळेतील विद्यार्थिनींनी झाडांशी भाऊ-बहिणीचे नाते जोडत त्यांच्यावर राख्या बांधल्या आणि वृक्षांच्या रक्षणासाठी संकल्प केला. ‘वृक्ष हे प्रदूषणाच्या दुष्ट शक्तींशी लढणारे आपले रक्षण करणारे भाऊ आहेत’ असा संदेश देत या मुलींनी झाडांप्रती आपुलकी आणि जबाबदारी व्यक्त केली. विशेष म्हणजे विद्यार्थिनींनी वापरलेल्या राख्या त्यांनी स्वतः तयार केल्या होत्या. यामध्ये प्लास्टिक, थर्मोकोल किंवा इतर पर्यावरणाला हानीकारक साहित्य न वापरता फक्त नैसर्गिक व पुनर्वापर करता येणाऱ्या साहित्याचा वापर करण्यात आला. यामुळे या उपक्रमातून पर्यावरण संवर्धनासोबतच शाश्वत उपभोगाची जाणीवही निर्माण झाली. या उपक्रमात विद्यालयाचे मुख्याध्यापक विश्वनाथ पाडवी व पर्यवेक्षक श्री. दाणी, विजय पाटील, रामराव बच्छाव, संजय जाधव, जिभाऊ खैरनार, सतीश ठोंबरे, दीपक दाभाडे, महेंद्र पाटील, दत्तू मोहिते, विनोद शिवदे, जयकुमार लाडे, श्रीमती मनीषा भामरे, संगीता आहेर, आरतीदेवी अहिरे (देवरे), वैशाली पानसरे, किरण दाणी, मोनिका सोर, चव्हाण भाऊसाहेब, महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला. शाळेच्या संपूर्ण परिसरातील झाडांना राख्या बांधून विद्यार्थिनींनी ‘वृक्ष हेच आपले रक्षण करणारे भाऊ’ असा आशय देणारे घोषवाक्यही उच्चारले. त्याचबरोबर झाडांच्या संवर्धनासाठी कटिबद्ध राहण्याचा संकल्पही त्यांनी केला.