पूर्वीपासून तिरळेपणाकडे एक विनोदाचा भाग म्हणून पाहिले जाते. त्याचा व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वावर नकारात्मक परिणाम होतो. आपण समाजात हसण्याचा विषय बनतो, याची जाणीव होते व व्यक्ती समाजापासून दूर होऊ लागते. इतरांपेक्षा स्वतःला कमी लेखू लागते. योग्य वेळेत ही समस्या लक्षात आल्यास ती दूर होऊ शकते व पुढील जीवनात येणार्या समस्या टाळू शकतात.
ज्यावेळेस दोन्ही डोळ्यांतील एकत्रित काम करण्याची क्षमता कमी होते किंवा संपते, त्यामुळे व बुबुळे एका सरळ रेषेत दिसत नाहीत त्याला तिरळेपणा असे म्हणतात.
तिरळेपणाची कारणे ः
लहान मुलांमध्ये एका डोळ्याची नजर कमी-जास्त असल्यास किंवा एका डोळ्याला चष्म्याचा नंबर जास्त असल्यास तिरळेपणा येतो. जन्मलेल्या बाळाचे वजन कमी असल्यास किंवा नऊ महिन्यांच्या आत बाळ जन्माला आलेले असल्यास, जन्मताना न रडलेल्या बाळास तिरळेपणा येऊ शकतो. जन्मलेल्या बाळाला ऑक्सिजन दिला गेला असेल तर. आनुवंशिकता, स्नायूंची लांबी जन्मतः कमी- जास्त असल्याने तिरळेपणा येतो. डोक्याच्या हाडांची रचना, तसेच डोळ्यांच्या हाडांची रचना सरळ नसल्यानेही तिरळेपणा येतो. अशा बालकांच्या मेंदूमधील फंक्शन सेंटरला बाधा होते. असंतुलित स्नायू शक्ती, डोळ्यास होणारा कमी रक्तपुरवठा, चष्म्याचा नंबर असल्यास, बुबुळावरील व्रण किंवा दृष्टिदोष असल्यास तिरळेपणा येऊ शकलो.
तिरळेपणाची लक्षणे ः
एक डोळा किंवा दोन्ही डोळे वेगवेगळ्या दिशेने पाहणे. तीव्र सूर्यप्रकाशात डोळे बंद होणे, एक किंवा दोन्ही डोळ्यांत दृष्टिदोष, दोन प्रतिमा दिसणे, तिरळेपणाची कारणे आणि लक्षणे आपण समजून घेतल्यानंतर त्यावरील उपाय पाहणे महत्त्वाचे ठरते; परंतु त्याअगोदर सर्वप्रथम आपल्या पाल्यामध्ये तिरळेपणा आहे, हे पालकांनी स्वीकारणे महत्त्वाचे ठरते. मूल जसे मोठे होत जाईल तसा तिरळेपणा आपोआप कमी होईल. लोक आपल्याला व मुलाला हसतील किंवा ऑपरेशन करावे लागेल, या भीतीपोटी काही पालक आपल्या मुलांना योग्य उपचार देत नाहीत; परंतु सर्वप्रथम पालकांनी हे लक्षात घेतले पाहिजे की, मुलांची नजर वय वर्ष सहापर्यंतच वाढते व त्यामुळे जन्माला आलेल्या प्रत्येक बालकाची त्याच्या तीन वर्षांच्या आतमध्ये बालनेत्ररोग तज्ज्ञांकडून तपासणी होणे गरजेचे असते. त्यामुळे योग्य वेळी आजाराचे निदान होऊन उपचार प्रभावी व परिणामकारक ठरतात.
उपचार ः
दोन्ही डोळ्यांची नजर एकसारखी असल्यास शस्त्रक्रियेचा निर्णय त्वरित घेता येतो. तिरळेपणाची शस्त्रक्रिया पूर्णपणे दोन किंवा तीन स्नायूंमधील कमी-जास्त अंतर ठेवून पूर्ण भूलेखाली केली जाते.
तिरळेपणाच्या शस्त्रक्रियेत नजर वाढत नाही; परंतु आहे तशीच राहते.काही प्रमाणात चष्म्याचा नंबर 10 ते 20 रुग्णांमध्ये ओव्हर, अंडरकरेक्शन ऑपरेशननंतर होऊ शकते.
तिरळेपणाची शस्त्रक्रिया दोन ते तीन टप्प्यांमध्ये केली जाते, पहिल्या ऑपरेशन नंतर कमीत कमी सहा त आठ महिने अंतर असावे लागते.
शस्त्रक्रिया 14 वर्षाखालील मुलांमध्ये पूर्ण भुलेखाली करावी लागते.
14 वर्षांवरील मुलांमध्ये तिरळेपणा किती आहे व कोणत्या स्नायूंवर शस्त्रक्रिया करायची आहे. त्यावर अंशतः/पूर्ण भुलेखाली ठरवावे लागते.
तिरळेपणाच्या शस्त्रक्रियेनंतर काही मुलांना पट्टी लावून नजर वाढविण्याचे उपचारदेखील करावे लागतात.
मुलांची थ्री डायमेन्शनल नजर ही वयाच्या आठ वर्षांपर्यंतच वाढत असते.
मोठ्या माणसांमध्ये शस्त्रक्रिया फक्त चांगले दिसण्यासाठीच करावी लागते. त्यांच्यामध्ये थ्री डायमेन्शन व्हिजन वाढण्याची संभावना नसते.
तिरळेपणाचे ऑपरेशन हे दोन पद्धतीने करतात, एक फिक्स टाके आणि दुसरे अॅडजेस्टेबल टाके. अॅडजेस्टेबल टाक्यांचे ऑपरेशन दोन टप्प्यांत करावे लागते.
तिरळेपणाचे ऑपरेशन किती व कोणत्या स्नायूवर करायचे आहे त्यावर त्याचा खर्च अवलंबून असतो. पण अॅडजेस्टेबल टाक्यांचे ऑपरेशन केल्याने रिझल्ट चांगला मिळतो.
बाळाच्या लसीकरणाप्रमाणे नेत्र तपासणीकडे पालकांनी पाहिले पाहिजे.