रोजंदारी कर्मचार्‍यांचा संयमाचा बांध सुटला

आदिवासी आयुक्तालयात केला प्रवेश

नाशिक : प्रतिनिधी
आदिवासी आश्रमशाळांतील रोजंदारी शिक्षकांना काढून बाह्यस्त्रोताद्वारे भरती करण्याच्या सरकारच्या निर्णयाला विरोध करणार्‍या बिर्‍हाड आंदोलकांनी बाह्यस्त्रोत रद्द करा, या मागणीसाठी महिन्यापासून आदिवासी विकास विभागासमोर आंदोलनास बसलेल्या रोजंदारी कर्मचार्‍यांचा संयमाचा बांध अखेर सुटल्याने आंदोलनकर्त्यांनी पोलिसांचा विरोध पत्करत गेटवरून उड्या मारत आयुक्तालयाच्या आवारात प्रवेश केला. आंदोलनकर्त्यांचे संख्याबळ अधिक असल्याने पोलीसही हतबल झाले. आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाला निर्णय घेण्याचा इशारा दिला आहे.
आदिवासी विकास विभागांतर्गत आदिवासी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या आश्रमशाळांमध्ये रोजंदारी वर्ग 3 आणि वर्ग 4 चे कर्मचारी गत तीन ते पाच वर्षांपासून शिक्षक आणि कामाठी या पदावर काम करीत असताना त्यांना अचानक काढून टाकण्यात आले आहे.
प्रशासनाकडून खासगी कंपनीकडून भरती करण्यात येणार्‍या कर्मचार्‍यांना त्यांच्या पदावर संधी देण्यात आली आहे. याला आंदोलनकर्त्या रोजंदारी कर्मचार्‍यांचा विरोध आहे. बाह्यस्त्रोत भरती प्रक्रिया रद्द करा, या मागणीसाठी रोजंदारी कर्मचारी 9 जूनपासून आदिवासी विकास विभागासमोर आंदोलन करत आहेत. 35 दिवसांनंतरही प्रशासन दखल घेत नसल्याने अखेर मंगळवारी (दि.13) सायंकाळी आंदोलकांनी गेटसमोर घोषणाबाजी करीत आंदोलन सुरू केले. लढेंगे, जितेंगे, होश मे आवो होश मे आवो, नोकरी आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची आदी घोषणा देत आंदोलनकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला. वातावरण तापल्याने पोलिसांनी गेटवर मानवी साखळी करून आंदोलनकर्त्यांना अडविले. मात्र, संतप्त आंदोलनकर्त्यांनी गेट तोडून पोलिसांचा विरोध पत्करत आत घुसण्याचा प्रयत्न केला.
पोलिसांनी अथक प्रयत्नांद्वारे आंदोलनकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, आंदोलनकर्त्यांचे संख्याबळ अधिक असल्याने पोलिसांचा नाइलाज झाला. सायंकाळी पाचच्या सुमारास आंदोलनकर्त्यांनी आदिवासी आयुक्तालयात प्रवेश करीत आवारात ठाण मांडले. सद्यःस्थितीत आंदोलनकर्त्यांनी आवारात तात्पुरते तंबू लावले असून, घोषणाबाजी सुरू आहे.
यावेळी आंदोलकांनी कंपनीमार्फत बाह्यस्रोेत भरती आदेश प्रत्यक्ष जाळून आपला रोष व्यक्त केला. या झटापटीत एका महिलेचा गळा दाबला गेल्याने ती खाली कोसळली. यानंतर तिला रुग्णालयात नेण्यात आले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *