नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
इंदिरानगर : वार्ताहर
वडनेर परिसरात बिबट्याने कारला दिली. तीन दिवसांपूर्वीच वडनेर दुमाला भागात बिबट्याच्या हल्ल्यात साडेतीन वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला होता. त्यानंतर पुन्हा लगेचच बिबट्या दिसल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे. या भागात पाच बिबटे असून, त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
सोमवारी रात्री 8 ते 9 च्या सुमारास नितीन गोरे नाशिकचे काम आटोपून स्विफ्ट डिझायर गाडी पाथर्डी फाटा, वडनेर रोडकडून आर्मी हेगलाइनमार्गे देवळाली कॅम्पला जात होते. त्याचवेळी वडनेर रोड भोलेनाथ मंदिराजवळील सिंगापूर आर्मी गेटसमोर एक बिबट्या आडवा आला. अचानक बिबट्या समोर आल्याने गोरे यांची चलबिचल झाली. त्यांनी जोरात गाडीचे ब्रेक लावले. मात्र, बिबट्या कारला धडकला. त्यानंतर बिबट्या जोरात पळून पुढे निघून गेला. यात कारचे किरकोळ नुकसान झाले. या घटनेमुळे परिसरात बिबट्याची दहशत कायम असल्याचे दिसून आले. त्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.