गणेशनगरातील प्रकार; मुलगी गंभीर जखमी
लासलगाव : वार्ताहर
लासलगाव येथील गणेशनगर परिसरात तीन वर्षांच्या चिमुकलीवर मोकाट कुत्र्यांनी हल्ला केल्यामुळे सदर चिमुकली गंभीर जखमी झाल्यामुळे तिला पुढील उपचारासाठी नाशिक येथील शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.
आरोही विशाल जाधव या तीन वर्षांच्या मुलीवर गणेशनगर परिसरात मोकाट कुत्र्यांनी हल्ला केला. यावेळी त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या नागरिकांनी आरडाओरड करून तिला त्या कुत्र्यापासून वाचवले व लासलगाव ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी दाखल केले. मात्र, सदर मुलगी गंभीर जखमी असल्यामुळे ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकार्यांनी तिला नाशिक येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठवले.
लासलगाव शहरात गेल्या काही दिवसांपासून अशा अनेक घटना घडत आहेत. लासलगाव ग्रामपंचायत प्रशासनाला नागरिकांच्या वतीने या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याबाबत निवेदनही देण्यात आलेले आहे, मात्र अजून कुठलाही बंदोबस्त केलेला नाही. या मोकाट कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी पुन्हा लासलगावकरांनी केली आहे.