गुजरातच्या व्यक्तीने त्यावेळी संपर्क केल्याची माजी आमदार चव्हाण यांची माहिती
सटाणा ः प्रतिनिधी
ईव्हीएम मॅनेज करून निवडणूक सेट करता येते का? या विषयावरून सध्या देशात गदारोळ माजला असताना, बागलाण विधानसभेच्या निवडणूक काळात निवडणूक सेट करून देतो, असे सांगणार्या गुजरात राज्यातील एका व्यक्तीने सटाण्यात आपली भेट घेऊन पाच ते आठ कोटी रुपये द्या, त्या बदल्यात 50 हजार ते दीड लाख मतांनी उमेदवार दीपिका चव्हाण यांना निवडणूक जिंकवून देतो, अशी हमी देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, सर्व सर्व्हे आमच्या बाजूने असल्याने आम्ही जनतेत जाऊन प्रामाणिकपणे निवडणूक लढविण्याचे ठरविले होते, अशी खळबळजनक माहिती राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे बागलाणचे माजी आमदार संजय चव्हाण यांनी दिली आहे.
एकीकडे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत मत चोरी झाल्याचा आरोप केल्यानंतर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक खासदार शरद पवार यांनीदेखील दिल्लीत दोन व्यक्तींनी भेट घेऊन विधानसभा निवडणूक मॅनेज करून देण्याचा गौप्यस्फोट केला होता. पवारांच्या या वक्तव्याला माजी आमदार संजय चव्हाण यांनी दुजोरा दिला आहे. यासंदर्भात ते म्हणाले की, बागलाण विधानसभा निवडणूक काळात भुज (गुजरात) येथील नारायणदास पटेल या आयटी क्षेत्रातीला तज्ज्ञाने आपल्याशी संपर्क साधून पाच कोटी रुपये द्या आणि आम्ही तुमच्या उमेदवार दीपिका चव्हाण यांना निवडून आणू, अशी ऑफर दिली होती. याबाबत मी तात्काळ तत्कालीन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी चर्चा करून त्यांना संपूर्ण माहिती दिली.
यानंतर नारायणदास पटेल याने निवडणूक काळात उमेदवार दीपिका चव्हाण यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्या प्रचारात व्यस्त होत्या, त्यामुळे त्यांच्याशी संपर्क न झाल्याने पटेल याने पुन्हा माझ्याशी संपर्क साधून तुम्ही जितके जास्त पैसे द्याल, तितक्या मतांची सेटिंग आम्ही करून देऊ. पाच कोटी ते आठ कोटी रुपये दिल्यास 50 हजार, एक लाख ते दीड लाख मतांची सेटिंग आम्ही करून देऊ. आम्ही त्याला स्पष्ट नकार दिला. मात्र यावेळी त्याने सांगितले की, जर आम्हाला तुम्ही पाच कोटी रुपये देत नसाल तर आम्ही समोरील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आणि विद्यमान आमदार दिलीप मंगळू बोरसे यांच्याकडे जाऊ आणि त्यांना विजयी करू. दरम्यान, आम्ही निवडणूक काळात एकूण पाच सर्व्हे केले होते. शेवटच्या सर्व्हे अखेर बागलाण विधानसभा मतदारसंघात आम्ही पाच ते आठ हजार मतांच्या मागे किंवा पुढे असू, असा अहवाल आम्हाला मिळालेला होता. त्यामुळे आम्ही जनतेत जाऊन प्रामाणिकपणे निवडणूक लढविण्याचे ठरविले होते, असेही माजी आमदार चव्हाण यांनी स्पष्ट केले.
बोरसेंचे मताधिक्य वाढले कसे?
गेल्या लोकसभा निवडणुकीत धुळे मतदारसंघात भाजपचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे यांना काँग्रेस उमेदवार डॉ. शोभा बच्छाव यांच्याकडून धक्कादायक व निसटता पराभव स्वीकारावा लागला होता. बागलाण विभानसभा मतदारसंघात भाजपचे डॉ. भामरे यांचे मताधिक्क्य 50 हजारांनी घटले असताना, विधानसभा निवडणुकीत मात्र भाजपच्याच दिलीप बोरसेंचे मताधिक्क्य तब्बल 1 लाख 29 हजारांनी कसे वाढले, असा प्रश्नही आता या ‘सेटिंग’वरून उघडकीस येत असल्याचे माजी आमदार संजय चव्हाण यांनी सांगितले.