अफवांची गावभर चर्चा; ग्रामीण भागात नागरिकांचा जागता पहारा
निफाड : तालुका प्रतिनिधी
गेल्या काही दशकापासून निफाड तालुक्यात बिबट्यांचा मुक्त वावर असताना शेळ्या, मेंढ्या आणि लहान बालके बिबट्याच्या हल्ल्यात ठार झाल्याच्या घटना अनेक ठिकाणी घडल्या आहेत. मात्र, यंदा बिबट्याने संपूर्ण जिल्हाच कार्यक्षेत्र बनविल्याने अवघा जिल्हा बिबट्याच्या दहशतीखाली आला आहे.
साहजिकच नागरिक सायंकाळी घराबाहेर पडण्याचे टाळू लागल्याने याचाच गैरफायदा उठवत भुरटे चोर शेती औजारे, विद्युतपंप, मोटारसायकली अन् आता चारचाकी वाहने चोरीला जाण्याचे प्रकार वाढले आहेत. चोरांची मजल आता थेट घरफोड्या आणि दुकानातील मालाची चोरी इथपर्यंत गेली आहे. भुरट्या चोरट्यांनी पोलिसांचीदेखील झोप उडवून दिली आहे. साहजिकच तालुक्यातील एकही गाव शोधूनही सापडणार काही की तेथे चोरट्यांची चर्चा नाही. चोरट्यांच्या भीतीमुळे म्हणा किंवा त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी म्हणा; परंतु नागरिकांना आता जागता पहारा द्यावा लागत आहे.
यावर्षी चोरांची पर्वणी सुरू झाली ती म्हणजे भेंडाळी, महाजनपूर परिसरात. त्यानंतर चोरीचे हे लोन म्हाळसाकोरेपर्यंत येऊन ठेपले. येथे रस्त्यालगत असणारी दुकाने आणि घरे फोडत, चोरांनी येथील किराणा साहित्य आणि काही रक्कम लंपास केली. त्यानंतर चोरीचे हे लोन सायखेडा गावापर्यंत पोहोचले. वाडीवस्तीवर चोर आल्याच्या वार्ता कानोकानी पसरू लागल्या.
साहजिकच उसाच्या क्षेत्रासह सर्वच परिसर पोलिस पिंजून काढू लागले. याच काळात नदीकाठच्या केबल, स्टार्टर आणि विद्युतपंप चोरीला जाण्याचे प्रकार वाढले. निफाड, शिवरे, कोठुरे, नांदूरमध्यमेश्वर या गावांतदेखील चोर येत असल्याचे नागरिक बोलू लागले. तालुक्याच्या गोदाकाठ भागातून आत्तापर्यंत शेकडो बिबटे जेरबंद केलेले असले तरीदेखील अद्यापपर्यंत बिबट्यांची संख्या कमी होण्याऐवजी वाढतानाच दिसत आहे. त्यामुळे बिबट्यांपासून पाळीव जनावरांचे आणि लहान मुलांचे संरक्षण करण्याची जबाबदारी पार पाडावी लागत असतानाच, आता शेतीपयोगी साहित्य चोरीला जात असल्याने शेतकर्यांची अवस्था म्हणजे सांगताही येत नाही अन् सहनही होत नाही, अशी झाली आहे.
त्यातच बिबट्याच्या भीतीमुळे मजूरवर्गदेखील शेतात काम करण्याचे टाळू लागले आहेत. त्यातच शेतीला पाणी देणे म्हणजे जीव मुठीत धरून काम करण्यासारखे आहे. कारण बिबट्या कोठून आणि कधी नजरेत पडेल सांगता येत नाही. वनविभागाने गोदाकाठचा हाच परिसर बिबट्या प्रवण क्षेत्र म्हणून घोषित केलेला असताना, बिबट्याचे जनावरे आणि मानवावर सर्वाधिक हल्ले याच परिसरात झालेले
आहेत.
बिबट्याची दहशत या परिसरात असल्याने त्याचाच फायदा उठवत चोरटे आपले काम फत्ते करीत आहेत.
अलीकडे चोर पकडण्याचे आणि त्यांना शासन करण्याचे प्रमाण कमी झाल्याने चोरांचे मनोबल वाढले आहे. त्यामुळे अगदी दिवसादेखील गजबजलेल्या भागात वाहने चोरीला जाण्याचे प्रकार वाढले आहे.
सध्या शेती मशागतीची कामे जोरात सुरू आहेत. मात्र, बिबट्यांच्या मुक्त संचारामुळे शेतीकामांना मजूर मिळेनासे झाल्याने ही कामे खोळंबू लागली आहे. त्यातच काही ठिकाणी चोर्या, तर कुठे अफवा यामुळे दहशतीखाली असणार्या नागरिकांना दिलासा मिळावा यासाठी पोलिसांनी चोरट्यांचा बंदोबस्त करावा तसेच वनविभागाने बिबटे जेरबंद करण्यासाठी ठोस उपाययोजना राबवावी.
-सोपान खालकर, शेतकरी, भेंडाळी