मविप्रच्या आयटीआयचा अभिनव उपक्रम
नाशिक : प्रतिनिधी
मविप्रच्या येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील बांबू प्रक्रिया व प्रशिक्षण उद्योग केंद्र येथे पर्यावरणपूरक बांबूपासून गणपती मूर्ती बनविण्याचा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे. बांबूपासून बनवलेल्या गणपती मूर्ती ना नफा ना तोटा तत्त्वावर लहान व मोठ्या स्वरूपात माफक दरात विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
अभियांत्रिकी व्यवसायाच्या शिक्षणाबरोबर बांबूच्या वस्तू बनविण्याचे प्रशिक्षण देऊन स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करण्याचा अभिनव उपक्रम राबविला जात आहे या प्रशिक्षण कार्यक्रमात बांबूपासून शिल्प व वस्तू बनवण्याचे कौशल्य विद्यार्थ्यांना मिळेल, तसेच अर्थार्जनासाठी या कौशल्याचा वापर कसा करावा याबाबत मार्गदर्शनही मिळणार आहे.यासाठी प्राचार्य आर. बी. पाटील, यांच्या मार्गदर्शनाखाली समन्वयक राजू काळे, दिनेश शिरसाळे, चंदू वैराळे, ललिता पाटील, रोशन वाघचौरे आदी विद्यार्थ्यांना प्रशिक्षणाबरोबरच विक्रीसाठी विविध बांबूच्या वस्तू उपलब्ध करीत आहेत व त्यासाठी चांगला प्रतिसाद मिळत आहे. बांबू स्वस्त असून, सहज उपलब्ध असल्याने, बांबूच्या सजावटीचा खर्च कमी असतो. बांबूच्या मदतीने तयार केलेल्या सजावटीला एक खास आणि आकर्षक लूक मिळतो.बांबू टिकाऊ असल्याने, बांबूच्या सजावटीचा वापर अनेक वर्षे करता येतो. पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने सदर पर्यावरण पूरक बांबूपासून बनविलेल्या गणपती मूर्ती ना नफा ना तोटा तत्त्वावर मविप्र आयटीआय, बांबू प्रक्रिया व प्रशिक्षण उद्योग केंद्र, उदोजी मराठा बोर्डिंग कॅम्पस,गंगापूर रोड नाशिक येथे ग्राहकांना विक्रीसाठी माफक दरात उपलब्ध असल्याचे आवाहन करण्यात आले आहे.