दीपा मुधोळ-मुंडे यांनी लावला प्रशासकीय कामाचा धडाका
नाशिक : प्रतिनिधी
बीड जिल्ह्याच्या प्रथम महिला जिल्हाधिकारी म्हणून ज्यांनी आपल्या प्रशासकीय कारकीर्दीची सुरुवात केली, व आपल्या कामाचा ठसा उमटवला, त्या दीपा मुधोळ-मुंडे यांची राज्याच्या समाजकल्याण विभागाच्या आयुक्तपदी नुकतीच नियुक्ती झाली आहे. दीपा मुधोळ- मुंडे यांच्या रूपाने समाजकल्याण विभागाला पहिल्या महिला आयुक्त लाभल्या आहेत.
आयुक्तपदाचा कार्यभार नुकताच स्वीकारला असून, त्यांनी आपल्या कामाची चुणूक दाखवून दिली आहे. त्यांनी ऑन फील्ड कामावर भर दिला असून, राज्यात विविध कार्यालयांना भेटी देऊन आढावा घेतला आहे. जुलै 2025 मध्ये त्यांची समाजकल्याण विभाग, पुणे या महत्त्वाच्या पदावर नियुक्ती झाली आहे. या नवीन जबाबदारीत समाजातील वंचित घटकांसाठी राबवल्या जाणार्या योजनांची परिणामकारक अंमलबजावणी आणि सुधारणा यावर त्यांनी काम सुरू केले आहे. विशेषतः बीड जिल्ह्यात ऊसतोड कामगार व त्यांचे प्रश्न त्यांनी जाऊन बघितलेले आहे. समाजकल्याण विभागाकडेच ऊसतोड कामगारांचा विभाग असल्याने ऊसतोड कामगारांना यानिमित्ताने नवीन आशा निर्माण झाली आहे.
कठोर शिस्त, स्पष्ट दृष्टिकोन आणि प्रत्यक्ष लोकसंपर्क ही दीपा मुधोळ-मुंडे यांच्या कार्यशैलीची वैशिष्ट्ये आहेत. प्रशासकीय जबाबदार्या सांभाळताना त्या केवळ धोरणनिर्मितीत मर्यादित न राहता स्वतः मैदानात उतरतात, हा त्यांचा वेगळेपणा आहे. त्यामुळे ज्या विभागाची जबाबदारी त्यांच्या हाती जाते, त्या विभागात कार्यक्षमतेची नवी उंची गाठली जाते, अशी प्रशासकीय वर्तुळातील बोलले जाते. त्याचाच प्रत्यय राज्याचा समाजकल्याण विभाग सध्या घेत आहे. समाजकल्याण विभागात विद्यार्थ्यांची शासकीय वसतिगृह, शासकीय निवासी शाळा व शिष्यवृत्ती हे महत्त्वाचे विषय असल्याने आयुक्तांंनी त्यांना प्राधान्य दिले आहे. विद्यार्थी शैक्षणिक हक्कांपासून वंचित राहू नये यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न चालविला आहे.
भारतीय प्रशासन सेवेत 2011 च्या बॅचमधून महाराष्ट्र कॅडरमध्ये दाखल झालेल्या दीपा मुधोळ-मुंडे यांनी गेल्या काही वर्षांत आपल्या कुशल कार्यशैली, निर्णयक्षमता आणि प्रत्यक्ष जनसंपर्कातून वेगळी ओळख निर्माण केली आहे. बीड जिल्ह्याच्या जिल्हाधिकारीपदापासून सुरुवात करून त्यांनी स्थानिक विकास योजनांवर लक्ष केंद्रित केले. प्रशासनातील तळागाळाशी थेट संवाद साधण्यावर त्यांचा भर राहिला. ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा, पाणीपुरवठा आणि शासकीय योजनांची अंमलबजावणी यावर त्यांनी प्रभावी
कामगिरी केली.
जुलै 2024 मध्ये पुणे महानगर परिवहन महामंडळ या महत्त्वाच्या संस्थेच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकपदाची जबाबदारी त्यांच्याकडे होती. पुण्यातील प्रवाशांसाठी विश्वासार्ह व आधुनिक सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उभी करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला होता. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी प्रत्यक्ष बसमध्ये प्रवास करून प्रवाशांचे अनुभव जाणून घेतले. विभागीय अधिकार्यांसोबत वारंवार बैठका घेऊन प्रकल्पांचे पुनरावलोकन केले. बस रिअल-टाइम ट्रॅकिंग, मोबाइल अॅप सुधारणा, तसेच मार्गावरील सेवांची गुणवत्ता वाढविण्यावर त्यांनी विशेष भर दिला. दीपा मुधोळ-मुंडे हे एक कुशल आणि वेगवान प्रशासनिक अधिकारी, ज्यांनी पुण्यासारख्या आव्हानांच्या भागात नेतृत्व केले, तेही प्रवाशांच्या हितासाठी. बीड जिल्ह्यात कार्यरत असताना आणि बीडच्या कलेक्टरपदावर असताना त्यांनी स्थानिक प्रशासकीय कामातही महत्त्वपूर्ण वाटा उचलला. आता त्यांच्या कामाचे सातत्य हे समाजकल्याण विभागात पाहावयास मिळत आहे. त्यांच्या स्थानांतरणाने त्यांनी समाजाभिमुख धोरणात्मक योजनांवर काम करायला सुरुवात केली आहे.