गणेशोत्सवात ‘गोदावरी महाआरती’ ठरणार नाशिकचा अभिमान

देशभरातून आमंत्रणे; महाराष्ट्राच्या भक्तिभावाला नवी दिशा

पंचवटी : प्रतिनिधी
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा प्राण म्हणजे गणेशोत्सव. दहा दिवस चालणारा हा उत्सव भक्तिभाव, आनंद, समाजसेवा आणि एकात्मतेचा महामहोत्सव म्हणून साजरा होतो. महाराष्ट्रातील प्रत्येक गल्लीबोळ, प्रत्येक गाव या दिवसांत गणेशमय होतो. परंतु या उत्सवाच्या सजावटी, भजन, कीर्तन, सामाजिक उपक्रमांच्या सोबतच एक वैशिष्ट्यपूर्ण आयाम म्हणजे ‘गोदावरी महाआरती’. रामतीर्थ गोदावरी सेवा समितीच्या पुढाकारामुळे गेल्या काही वर्षांत गणेशोत्सवातील या महाआरतीने महाराष्ट्राच्या भक्तिभावाला नवी दिशा दिली आहे. त्यामुळेच दरवर्षीप्रमाणे यंदाही समितीला महाराष्ट्रासह देशाच्या कानाकोपर्‍यांतून महाआरती सादर करण्यासाठी आमंत्रणे प्राप्त झाली आहेत.

दरवर्षीप्रमाणे यंदाही समितीला नाशिक जिल्ह्यातील झोडगे, मालेगाव, सटाणा, छत्रपती संभाजीनगर, ईश्वरपूर, तसेच कोल्हापूर, सांगली, पुणे या शहरांसह महाराष्ट्राच्या पलीकडे गुजरातमधील सुरत व ब्यारा, कर्नाटकातील मुधोळ, आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम आणि अगदी काश्मीरपर्यंतची आमंत्रणे पोहोचली आहेत. समितीकडे याची लेखी नोंद असून, हे नाशिककरांसाठी अभिमानास्पद ठरले आहे. गोदामातेचे पावित्र्य आणि नाशिकच्या धार्मिक वारशाची पताका देशभर फडकत असल्याचे यानिमित्ताने अधोरेखित झाले आहे, अशी माहिती समितीचे सचिव मुकुंद खोचे, प्रसिद्धिप्रमुख राजेंद्र फड व युवाप्रमुख चैतन्य गायधनी यांनी दिली आहे.
गत दोन दिवसांत मुंबई व कोल्हापूर येथे झालेल्या महाआरतींना असंख्य भक्तांचा उस्फूर्त प्रतिसाद लाभला. आरतीच्या वेळी हजारोंच्या संख्येने भाविकांनी गोदामातेच्या गजरात सहभाग घेतला. विशेष म्हणजे, मुंबईतील काळाचौकी मित्रमंडळातर्फे आयोजित महाआरतीचे थेट प्रक्षेपण केवळ एका तासात दीड लाखांहून अधिक भक्तांनी ऑनलाइन पाहिले. हा एक विक्रम मानला जात असून, गोदावरीवरील भक्तिभाव आणि नाशिकच्या संस्कृतीबद्दल असलेल्या जनमानसांतील प्रेमाचे हे जिवंत प्रतीक ठरले आहे.

गोदामातेचा झगमगता दीप

समितीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या यशाचे श्रेय नाशिककरांच्या श्रद्धा, प्रेम व पाठिंब्याला दिले. ‘ही महाआरती केवळ धार्मिक सोहळा नाही, ती गोदामातेच्या पावित्र्याची, नाशिकच्या अध्यात्मपर संस्कृतीची आणि राष्ट्रीय एकात्मतेची झगमगती पताका आहे,’ अशा भावना समितीने व्यक्त केल्या. युवा गोदासेवकांनी दाखविलेला उत्साह, नि:स्वार्थी श्रम आणि समर्पण पाहून समितीने त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.

भाविकांसाठी प्रेरणास्थान

हा उपक्रम केवळ समितीचा नव्हे, तर समस्त नाशिककरांचा अभिमानाचा ठेवा आहे. नाशिककरांच्या अलोट प्रेम व सहकार्यामुळेच हे उपक्रम यशस्वी होतात, असे समितीच्या वतीने सांगण्यात आले. आगामी काळात या महाआरतीचा प्रेरणादायी प्रकाश देशभर पसरून गोदामातेच्या नामस्मरणाचा जाज्वल्य दीप प्रज्वलित ठेवेल, यात शंका नाही.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *