गोदेला पूर, जनजीवन विस्कळीत
नाशिक : प्रतिनिधी
राज्यात पुढील 24 तासांसाठी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी व नाशिकच्या घाटमाथ्याचा परिसर आदी भागांत यलो अलर्ट, तर नाशिक जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. यामुळे प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना आहेत. आज पाऊस उघडीप देण्याची शक्यता आहे.
शहरासह नाशिक जिल्ह्यात गत 24 तासांत 44 मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. शहरात बुधवारी (दि.20) रोजी 22.2 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील धरणसाठ्यांतही सातत्याने वाढ होत असल्याने विसर्ग वाढविण्यात आला आहे. एकट्या नांदूरमध्यमेश्वरमधून 15 हजार 775 क्यूसेक विसर्ग सुरू आहे. याशिवाय दारणा 22 हजार, तर गौतमी गोदावरीतून 3 हजार 450 क्युसेकने विसर्ग सुरु आहे. नंदुरबार, नाशिक घाट, पालघर, ठाणे, मुंबई शहर, मुबई उपनगर, सातारा घाट, रत्नागिरी, कोल्हापूर घाट या भागात ऑरेंज अलर्ट देण्यात आले असून जिल्हा प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. भारतीय हवामान विभाग व राष्ट्रीय रिमोट सेन्सिंग केंद्र (एनआरएससी) या केंद्रीय संस्थासोबत सतत संपर्क साधून पुढील हवामानाच्या अंदाजाची माहिती घेऊन सर्व जिल्ह्यांना प्रसारित करण्यात येत आहे.