जुन्या नाशकात दुमजली घर कोसळले

दोन मुलांसह सात जण जखमी

नाशिक / जुने नाशिक : प्रतिनिश्री
येथील खडकाळी परिसरातील त्र्यंबक दरवाजा पोलीस चौकीजवळील हॉटेल गरीब नवाजच्या मागील बाजूस असलेले जुने दुमजली घर काल रात्री कोसळले. यात सुमारे सात लोक दबले गेले होते. मात्र, या सर्वांना काही वेळेतच सुखरूप बाहेर काढून जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. अग्निशमन दलाचे प्रमुख संजय बैरागी यांच्यासह सुमारे पन्नास जवानांनी वेळेवर बचाव कार्य सुरू केल्याने मोठा अनर्थ टळला. पण चार वाहने दबली गेली असल्याचे समजतेे. ही घटना रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडली. रात्री उशिरापर्यंत बचावकार्य सुरू होते.
या घटनेत दोन लहान मुलांसह पाच जण अडकले होते. या सर्वांना अग्निशमन दलाच्या जवानांनी स्थानिक युवक व परिसरातील नागरिकांच्या मदतीने बाहेर काढले. दरम्यान, हा वाडा पडताना या भागात मोठा आवाज झाल्याने तेथील नागरिकांत काही काळ घबराट पसरली होती. या घटनेत जखमी झालेले मोहसीना खान (वय 40), नासिर खान (55), अकसा खान (26), मुद्दशीर खान (21), आयेशा खान (15), आयेशा शेख (12), हसनैन शेख (7), जोया खान (22) यांना तातडीने जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. अग्निशमन दलाचे अधिकारी संजय बैरागी, नगररचना विभागाचे कनिष्ठ अभियंता संतोष जोपुळे, बांधकाम विभागाचे बी. बी. जाधव यांच्यासह इतर स्थानिक नागरिकांच्या मदतीने अडकलेल्यांना बाहेर काढण्यात आले. दरम्यान वाड्याचा मलबा गुरूवारी (दि.21) महापालिकेच्या बांधकाम विभागातर्फे हटविला जाणार आहे. हा घर नूर शेख नावाच्या व्यक्तीच्या असल्याचे बोलले जात आहे, मात्र मालक राहत नव्हते. दरम्यान महापालिकेचे विभागीय अधिकारी राजाराम जाधव यांचे सह इतर अधिकारी त्वरित घटनास्थळी दाखल झाले होते तसेच भद्रकाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश चौधरी यांच्यासह मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त होता.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *