शंभर प्लसच्या आडून भाजपचे स्वबळाचे बाण
नाशिक : प्रतिनिधी
महापालिका निवडणुकीत महायुती झाली तरी शंभर प्लस. महायुती झाली नाही तरीही भाजप शंभर प्लस जाणारच, असा दावाच गेल्या आठवड्यात जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी करत स्वबळाचा नारा दिला. मंत्री महाजनांच्या वक्तव्याला शिवसेना शिंदे गटाने उत्तर दिले आहे. महायुती झाली तर ठीक, अन्यथा आम्हीही स्वबळासाठी तयार आहोत. सर्व प्रभागांत ताकदीचे उमेदवार तयार असल्याचे शिवसेना शिंदे गटाचे उपनेते तथा जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांनी आम्हीही स्वबळासाठी तयार असल्याचे सांगत भाजपला प्रत्युत्तर दिलेे.
नाशिक महापालिकेची निवडणूक जानेवारीपर्यंत होण्याची शक्यता आहे. महापालिका प्रशासनाकडून 11 जूनपासून प्रभागरचना तयार करण्याचे काम सुरू होते. राज्य शासनाच्या नगरविकासला प्रभाग रचना पाठवली असता, राज्य निवडणूक आयोगाला प्रभागरचना सादर करण्यात आली आहे. त्यनंतर पुढील आठवड्यात प्रभागरचना जाहीर घेऊन हरकती व सूचना मागवल्या जाणार आहेत. दरम्यान, नाशिक महापालिकेत तीन वर्षांपासून प्रशासक राजवट असल्याने सर्वपक्षीय राजकीय पदाधिकारी निवडणुकीसाठी आसुसले आहेत. प्रभागरचना प्रसिद्ध झाल्यानंतर राजकीय पक्षातील वातावरण ढवळून निघणार आहे. गतवेळेस सत्ता मिळवणार्या भाजपने पुन्हा एकहाती सत्तेसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. परंतु, शिंवसेना शिंदे गटही मागे नसून, त्यांनीही जोरदार तयारी सुरू केली आहे. विशेषत: ठाकरे गटाचे सर्वाधिक माजी नगरसेवकांना फोडत त्यांच्याकडे खेचले. गेल्या वर्षभरापासून भाजपच्या स्थानिक पदाधिकार्यांकडून स्वबळाची भाषा केली जात आहे. परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्थानिक स्वराज्य निवडणुका महायुतीतच होणार असल्याचे सांगत आहेत. फक्त काही ठिकाणी स्थानिक पदाधिकार्यांची भूमिका पाहून तेथे वेगळा निर्णय घ्यावा लागेल, अशी भूमिका घेतली जात आहे. नाशकात स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहणाचा मान मंत्री महाजनांना मिळाला. भलेही यावरून महायुतीत नाराजी होती. मात्र, त्या दिवशी मंत्री महाजन यांनी शंभर प्लस सांगून स्वबळाचा नारा दिला.
शिवसेनेकडे (शिंदे गट) सर्व प्रभागांत ताकदीचे उमेदवार आहेत. पक्षश्रेष्ठी जो निर्णय देईल तो आम्हाला मान्य असेल. महायुती झाली तर ठीक, स्वबळावर लढण्यासाठी शिवसेना समर्थ आहे.
-अजय बोरस्ते, जिल्हाप्रमुख, शिवसेना शिंदे गट