नाशिक-पुणे मार्गावर मेंढपाळांचा अर्धा तास रास्ता रोको

दीड किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा; मेंढ्या चोरीचा तपास लागत नसल्याने मेंढपाळ आक्रमक


सिन्नर : प्रतिनिधी
तालुक्यात मेंढ्या चोरीच्या लागोपाठ तीन घटना घडूनही पोलिसांकडून या घटनांचा तपास लागत नसल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र मेंढपाळ आक्रोश आंदोलन समितीच्या वतीने शुक्रवारी (दि.29) नाशिक – पुणे महामार्गावर दोडी बुद्रुक शिवारात मेंढ्या रस्त्यावर आणत सुमारे अर्धा तास रास्ता रोको करण्यात आला. त्यामुळे नाशिक – पुणे महामार्गावर म्हाळोबा पाटी येथे रस्त्याच्या दुतर्फा सुमारे दीड ते दोन किलोमीटर अंतरापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
महाराष्ट्र मेंढपाळ आक्रोश आंदोलन समितीचे सखाराम मालू सरक यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. सिन्नरचे धनगर समाजाचे नेते आनंदा कांदळकर, दीपक सुडके, लक्ष्मण बर्गे यांच्यासह नाशिक आणि नगर जिल्ह्यातील मेंढपाळ मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते. सकाळी 12.15 वाजेच्या सुमारास सुरू झालेले हे आंदोलन 12.45 मिनिटांनी संपुष्टात आले. मेंढ्या चोरीच्या सिन्नर तालुक्यात घडलेल्या तीनही घटनांसंदर्भात पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आरोपींचा शोध सुरू असून, लवकरात लवकर आरोपींना अटक करण्यात येईल, असे आश्वासन उपविभागीय पोलीस अधिकारी के. के. पाटील यांनी दिल्यानंतर महाराष्ट्र मेंढपाळ आक्रोश आंदोलन समितीच्या वतीने आंदोलन मागे घेण्यात आले. मेंढ्या चोरट्यांना तत्काळ अटक करून चोरी गेलेल्या मेंढ्या पुन्हा मिळवून द्याव्यात, मेंढपाळांना स्वसंरक्षणासाठी बंदुकीचे परवाने द्यावेत आदी मागण्यांचा या निवेदनात समावेश होता. आंदोलनस्थळी पोलीस उपविभागीय अधिकारी के. के. पाटील यांच्या नेतृत्वाखाली बंदोबस्त ठेवण्यात आला होता. वावी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक गणेश शिंदे, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद सरोवार, चव्हाणके, गरुड, महसूलचे मंडळ अधिकारी तौर, गोपनीय पोलीस कर्मचारी शहाजी शिंदे यांच्यासह वावी पोलीस ठाण्याचे स्थानिक 15 आणि मुसळगाव एमआयडीसी पोलीस ठाणे आणि सिन्नर पोलीस ठाण्याचे अतिरिक्त 10 पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात होते. आंदोलन संपल्यानंतर पोलिसांनी दोन्ही बाजूंची वाहतूक सुरळीत करून दिली.

लागोपाठच्या तीन घटनांमुळे मेंढपाळ बांधवांचे आंदोलन

सिन्नर तालुक्यातील वावी पोलीस स्टेशन हद्दीत म्हाळोबा फाट्याजवळ दत्तनगर पालवेवाडी येथून दि. 22 रोजी रात्री 1 ते 2 वाजेच्या दरम्यान शंकर कारभारी खेमनर (रा. साकूर, ता. संगमनेर जि. अहिल्यानगर) या मेंढपाळाच्या 25 मेंढ्या व कामा शिवा कोळपे (रा. ढवळपुरी, ता. पारनेर, जि. अहिल्यानगर) यांच्या 12 मेंढ्या, धोंडवीरनगर (ता. सिन्नर, जि. नाशिक) येथून चोरीस गेल्या. तसेच तिसरी घटना दुशिंगवाडी (ता. सिन्नर) येथे घडली. मेंढपाळ आनंदा गोराणे यांच्या 20 मेंढ्या चोरीला गेल्या. सदर तीनही घटनांतील आरोपी अद्याप अटक न केल्याने मेंढपाळांचा पोलीस प्रशासनाच्या विरोधात रोष वाढला आहे. पोलीस प्रशासनाकडून आरोपी शोधण्यात हलगर्जीपणा केला जात असल्याचा आरोप करत महाराष्ट्र मेंढपाळ आक्रोश आंदोलनाच्या वतीने रास्ता रोको करण्यात आला.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *