पिंपळगाव खांब येथे तिसरा बिबट्या जेरबंद
गावकऱ्यांच्या मदतीने वनविभागाचे यश
सिडको दिलीपराज सोनार
)पिंपळगाव खांब परिसरात सध्या बिबट्याचा वाढता वावर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करत आहे. मागील काही दिवसांपासून बिबट्याचे दर्शन वेगवेगळ्या मळे परिसरात होऊ लागले होते. अखेर गावकऱ्यांच्या सतर्कतेमुळे आणि वनविभागाच्या वेळेवर हस्तक्षेपामुळे पिंपळगाव खांब परिसरातील सोमनाथ बोराडे यांच्या बंगल्याच्या मागे वनविभागाने लावलेल्या पिंज-यात तिसरा बिबट्या यशस्वीरित्या जेरबंद करण्यात आला.
हा बिबट्या फिल्टर प्लांट मळे परिसर, महालक्ष्मी नगर मळे परिसर तसेच भवानी नगर मळे परिसर येथे वारंवार फिरताना दिसून आला होता. वनविभागाने स्थानिक रहिवाशांच्या मदतीने बिबट्याच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवले. योग्य ठिकाणी पिंजरा लावण्यात आला आणि त्यात बिबट्या अडकला.
बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी मोठ्या संयमाने व कौशल्याने कारवाई केली. यामध्ये पिंपळगाव खांब परिसरातील ग्रामस्थांनी सक्रिय सहभाग घेतला. बिबट्याच्या वाढत्या संख्येमुळे परिसरातील शेतकरी आणि नागरिकांमध्ये अस्वस्थता होती, कारण जनावरांवर तसेच माणसांवरही संभाव्य हल्ल्याची भीती वाटत होती.
सध्या पकडलेल्या बिबट्याची वैद्यकीय तपासणी करण्यात येत असून, त्यानंतर त्याला जंगलात सोडण्याची कार्यवाही केली जाणार आहे. स्थानिक प्रशासन आणि वनविभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, अजून एखादा बिबट्या परिसरात असल्याची शक्यता नाकारता येत नाही.