मुंबई :
जरांगे पाटील यांना आंदोलन पुढे सुरू ठेवण्याची परवानगी नाही. त्यामुळे कायद्यात तरतुदीनुसार राज्य सरकारने पावले उचलावीत. आज सायंकाळी चार वाजेपर्यंत आझाद मैदानाव्यतिरिक्त सगळी जागा व रस्ते खाली करावेत, असा महत्त्वाचा आदेश हायकोर्टाने दिला आहे. यावेळी मुंबईतील मराठा आंदोलन हाताबाहेर गेले आहे, मुंबईत मराठा आंदोलकांना येऊ देऊ नका, असे निर्देश राज्य सरकारला दिले आहेत.
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचं मुंबईतील आझाद मैदानात उपोषण सुरू आहे. मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा सोमवारी (1 सप्टेंबर) चौथा दिवस आहे. दरम्यान, मनोज जरांगे पाटील
यांच्या आंदोलनाविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाकडून सोमवारी (1 सप्टेंबर) तातडीची सुनावणी घेण्यात आली. या सुनावणीत उच्च न्यायालयात जोरदार खडाजंगी झाली. आंदोलन हाताबाहेर गेल्याचे निरिक्षण
उच्च न्यायालयाने नोंदवले. तसेच सदर याचिकेवर उद्या (2 सप्टेंबर) दुपारी 3 वाजता उच्च न्यायालयात पुन्हा सुनावणी होणार आहे. उद्या आदेशाच पालन झाले की नाही ते राज्य सरकारला न्यायालयात सांगावे लागणार आहे. तसेच सीएसएमटी, मरीन ड्राईव्ह, फ्लोरा फाउंटेन आणि दक्षिण मुंबईतील इतर परिसरातून आंदोलकांना हटवण्याचे उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश दिले आहेत. आंदोलकांवर जरांगे पाटलांचेही नियंत्रण नाही. सर्व पूर्ववत करण्यासाठी आंदोलकांना 2 दिवसांचा अवधी हायकोर्टाने दिला आहे. यावेळी न्यायालयाने, मुंबईतील मराठा आंदोलन हाताबाहेर गेलं आहे, मुंबईत मराठा आंदोलकांना येऊ देऊ नका असे निर्देश राज्य सरकारला दिले
आहेत.
आंदोलनामुळे यंत्रणा ठप्प – सदावर्ते
हायकोर्टात मराठा आंदोलनाबाबत युक्तिबाबत करताना वकील गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटले की, या आंदोलनामुळे सीएसएमटी आणि परिसरात चार मोठी रुग्णालय आहेत. तेथील जनजीवन आणि आवश्यक यंत्रणा ठप्प झाल्या आहेत. सीएसएमटी हे अत्यंत संवेदनशील ठिकाण आहे तिथे आंदोलन केले जात आहे. कोर्टाच्या आजूबाजूलही आंदोलक आहेत. सगळ्या रस्त्यांवर गाड्या अडवत आहेत असे म्हणत सदावर्तेंनी सीएसटीमधल्या तुफान गर्दीचे व्हिडिओ आणि फोटो न्यायाधीशांना दाखवले.
हायकोर्टाने आंदोलकांना फटकारले
मुंबईत सुरू असलेले आंदोलन हाताबाहेर गेले आहे. पावसाची शक्यता असताना तुम्ही मुंबईत आलात. पावसात आंदोलन करता तर चिखलात बसण्याची तयारी ठेवा. मुंबईकरांना नाहक त्रास होता कामा नये. तुम्ही आंदोलनासाठी देण्यात आलेल्या नियमांचे पालन करणार का? असा सवाल हायकोर्टाने आंदोलकांच्या वकिलांना विचारला. पाच हजारांपेक्षा जास्त असलेल्या आंदोलकांनी परत जावे, असे पत्रक तुम्ही काढणार का? असा सवालदेखील हायकोर्टाने विचारला आहे.
दुकाने बंदचे आदेश दिले नव्हते : मुख्यमंत्री
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘आंदोलनाच्या पहिल्या दिवशी काही लोकांनी धुडगूस घातला, त्यानंतर व्यापार्यांनी त्यांची दुकाने बंद ठेवली. यावर आम्हाला उपाशी ठेवण्याचा प्रयत्न झाला, असा आरोप करण्यात आला. कुणीही त्या व्यापार्यांना दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले नव्हते. काही लोकांनी धुडगूस घातल्यानंतर व्यापार्यांनी तसा निर्णय घेतला. नंतर आम्ही त्यांना सांगितलं, तुम्ही दुकानं उघडी ठेवा, आम्ही त्या ठिकाणी पोलीस फोर्स ठेवतोय. त्यानंतर व्यापार्यांनी दुकानं उघडी ठेवली आणि आताही ती उघडी आहेत.‘
जरांगेंची प्रकृती ढासळली; तपासणी नाकारली
मुंबईतील आझाद मैदानात सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाचा काल चौथा दिवस होता. मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती ढासळत आहे. कालपासून जरांगे पाटील यांनी पाणी पिणे सोडून दिले आहे, मात्र मराठा बांधवांच्या आग्रहास्तव त्यांनी थोडं पाणी प्यायलं होतं. मनोज जरांगे पाटील यांची तब्येत ढासळली असून, अंगात त्राण उरले नसल्याचं दिसून येत आहे. दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी वैद्यकीय तपासणी नाकारली आहे. तपासणी करण्यासाठी आलेल्या सर्व डॉक्टरांना निलंबित करा, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे केली आहे.
लवकर मुंबईचे रस्ते सोडा जरांगे यांची आंदोलकांना सूचना
मुंबई :
मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा कालचा चौथा दिवस होता. त्यातच काल सुट्टी असूनही उच्च न्यायालयाने जरांगेंच्या आंदोलनाविरोधातील याचिकेवर सुनावणी घेत आंदोलकांनी आझाद मैदानातच बसावे, इतरत्र फिरत बसू नये, आदेश दिले आहेत. यावर जरांगे यांची प्रतिक्रिया आली आहे. तुमच्या लेकरांसाठी मी लढत आहे. मी मेलो तरी चालेल पण आंदोलन करणारच आणि आरक्षण घेणारच, असे सांगत रस्त्यावर गोंधळ न घालता शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडावेत, अशा सूचना जरांगे यांनी रस्त्या-रस्त्यांवर असलेल्या मराठा आंदोलकांना दिल्या.
तसेच जे आंदोलक आहेत त्यांनी आझाद मैदान सोडू नये, तिथेच राहावे. पार्किंगची सोय असलेल्या ठिकाणी गाड्या लावाव्यात, मुंबईला आणि मुंबईकरांना त्रास होऊ नये असे वागा, आंदोलन बदनाम करण्यासाठी षडयंत्र रचले जात आहे. आम्ही कोर्टाच्या निर्णयाचे पालन करणार आहोत, असे जरांगे यांनी सांगितले. ज्याला ऐकायचेच नाही त्याने गावाकडे गेले तरी चालेल, अशा शब्दांत जरांगे यांनी सुनावले आहे.