नासर्डी ते पाथर्डी परिसरात गणेशोत्सवाचे उत्साही वातावरण

देखाव्यांना भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

सिडको ः विशेष प्रतिनिधी
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर इंदिरानगर, राजीवनगर, नासर्डी ते पाथर्डी या संपूर्ण परिसरातील रस्त्यांवर भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसून येत आहे. रात्री उशिरापर्यंत गणपती दर्शनासाठी रस्ते फुलून जात असून, विविध मंडळांकडून सामाजिक प्रबोधन, आरोग्य शिबिरे, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे.
इंदिरानगर येथील युनिक ग्रुपतर्फे युनिक ग्राउंड येथे साकारण्यात आलेल्या 21
फूट उंचीच्या श्रीकृष्ण मूर्तीसह आकर्षक मंदिर आणि विद्युत रोषणाई भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही आनंद मेळाव्यात झुला, मौत का कुवा यांसह महिलांसाठी उभारण्यात आलेल्या स्टॉलवर खवय्यांची मोठी गर्दी दिसून येत आहे. या उपक्रमात संस्थापक अध्यक्ष सतीश सोनवणे यांच्यासह युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक, उत्सव समितीने विशेष परिश्रम घेतले आहेत.
राणेनगर प्रवेशद्वाराजवळ सह्याद्री मंडळाच्या वतीने माजी स्थायी समिती सभापती अमोल जाधव आणि माजी नगरसेविका संगीता जाधव यांनी साकारलेला देखावा लक्षवेधी ठरतो आहे. याच परिसरात हिंदूजनसंपर्क कार्यालयाच्या वतीने साकारलेला वामन अवताराचा देखावा आणि हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठानच्या कला व क्रीडा मैदानात सागर देशमुख व पूजा देशमुख यांनी उभारलेला आनंद मेळा भाविकांचे आकर्षण ठरत आहे. येथे जत्रेचा माहोल निर्माण झाला असून, विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल, मनोरंजनाची साधने, राहाटपळणे, मौत का कुवा यामुळे रात्री उशिरापर्यंत गर्दी
उसळत आहे.
रथचक्र चौकात युवक मित्र मंडळाच्या वतीने कटपुतलीचा खेळ सादर करण्यात आला असून संस्थापक अध्यक्ष संजय गायकर यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम पार पडत आहे. कलानगर येथे संघर्ष सेवाभावी संस्थेच्या वतीने माजी आमदार वसंत गीते व संस्थापक अध्यक्ष आकाश खोडे यांनी इंदिरानगरचा मानाचा राजा म्हणून राजवाड्याची सजावट साकारली असून, त्याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
रथचक्र चौकातील स्वातंत्र्यवीर सावरकर मित्रमंडळ, पाथर्डी फाट्यावर शंभू नारायण ग्रुप, संत चार्वाक चौकातील अरुणोदय मित्रमंडळ या मंडळांनी आकर्षक मूर्ती आणि देखावे सादर केले आहेत. दररोज विविध वयोगटांनुसार स्पर्धा, सामूहिक अथर्वशीर्ष पठण, सांस्कृतिक कार्यक्रम, आरोग्य शिबिरे आयोजित केली जात आहेत.
पाथर्डी परिसरातील शंभू नारायण ग्रुपतर्फे उभारण्यात आलेली 21 फूट उंच गणेशमूर्ती भाविकांचे विशेष लक्ष वेधत आहे. ज्ञानेश्वरनगर परिसरातील अंतर्गत रस्त्यांवर मथुरा येथील प्रेम मंदिर, कामाख्या मंदिर या देखाव्यांसाठी भाविकांची मोठी गर्दी सायंकाळपासूनच दिसून येते आहे.
रथचक्र चौक येथे भाजपच्या माजी नगरसेविका डॉ. दीपाली कुलकर्णी आणि सचिन कुलकर्णी यांनी अजय मित्र मंडळाच्या माध्यमातून ‘ऑपरेशन सिंदूर’ या विषयावर साकारलेला साठ मिनिटांचा जिवंत देखावा भाविकांचे आकर्षण ठरत आहे. या देखाव्यात परिसरातील बालकलाकारांनी सहभाग घेतला असून, संपूर्ण देखावा मंडळाच्या कार्यकर्त्यांनीच साकारला आहे.
दरम्यान, काही राजकीय इच्छुकांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भव्यदिव्य फलक लावून, गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देत आपली प्रतिमा उभारण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, या कृतीकडे स्थानिकांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *