राहुल धोत्रे हत्याकांड; दोघे संशयित जेरबंद

पंचवटी/सिडको : प्रतिनिधी
नांदूर नाका परिसरात झालेल्या बहुचर्चित राहुल धोत्रे हत्याकांडातील फरारी संतोष बाळू मते (वय 40, रा. दिंडेवाडा, मारुती मंदिराजवळ, नांदूरगाव) तसेच स्वप्निल मदन बागूल (वय 33, रा. जुना राजवाडा, बुद्धविहारच्या मागे, नांदूरगाव) यांना जेरबंद करण्यात गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाला यश आले आहे. मात्र, यातील संशयित व भाजपाचा माजी नगरसेवक उद्धव निमसे अद्यापपर्यंत फरारच आहे.
याबाबतचे अधिक वृत्त असे की, 22 ऑगस्टला सायंकाळी झालेल्या किरकोळ वादातून राहुल धोत्रे व आतेभाऊ अजय कुसाळकर यांचा पाठलाग करून धारदार शस्त्राने सपासप वार करण्यात आले होते. यात दोघेही गंभीर जखमी झाल्याने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान राहुल धोत्रे याचा मृत्यू झाल्याने संतप्त नातेवाईक तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी हल्लेखोरांसह माजी नगरसेवक उद्धव निमसे यांना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह न स्वीकारण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी जिल्हा रुग्णालय तसेच पोलीस आयुक्त कार्यालयासमोर ठिय्या देण्यात आला होता. वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी धोत्रे कुटुंबीयांची समजूत काढत कारवाईचे आश्वासन दिल्याने 24 तासांनंतर अंत्यविधी करण्यात आला होता.
यातील हल्लेखोरांना पकडण्यासाठी आडगाव पोलीस तसेच गुन्हे शाखेची पथके माग काढत असताना युनिट एकच्या पथकातील हवालदार प्रशांत मरकड व मिलिंदसिंग परदेशी यांना बातमीदाराकडून बातमी मिळाली की, सदर गुन्ह्यातील संतोष मते हा वाडीवर्‍हे गाव, कवटी फाटा येथे येणार असल्याची माहिती मिळाली. त्या अनुषंगाने पथकाने तेथे जाऊन खात्री केली असता, बातमीप्रमाणे कवटी फाटा, गणेश वडापावच्या समोर, पंचवटी अमृततुल्य, वाडीवर्‍हे येथून संतोष बाळू मते यास ताब्यात घेण्यात आले.
याचदरम्यान हवालदार विशाल देवरे व प्रवीण वाघमारे यांना बातमीदाराकडून बातमी मिळाली की, यातील संशयित स्वप्निल बागूल हा पपया नर्सरीजवळ, नाशिक येथे येणार असल्याची माहिती मिळाली. त्या अनुषंगाने अधिकारी व अंमलदार यांनी पपाया नर्सरी, नाशिक येथे जाऊन खात्री केली असता, पपया नर्सरी, सातपूर, नाशिक येथून स्वप्निल मदन बागूल (33, रा. नांदूरगाव, जुना राजवाडा, बुद्धविहारच्या मागे, नाशिक) यास ताब्यात घेतले. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहायक आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट एक पोलीस निरीक्षक मधुकर कड, उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, सुदाम सांगळे, किरण शिरसाठ, हवालदार प्रदीप म्हसदे, मिलिंदसिंग परदेशी, प्रवीण वाघमारे, विशाल देवरे, प्रशांत मरकड, योगीराज गायकवाड, संदीप भांड, नाजीमखान पठाण, रोहिदास लिलके, मुक्तार शेख, अमोल कोष्टी, मनीषा सरोदे यांनी ही कामगिरी बजावली आहे.

उद्धव निमसे मात्र अद्यापही फरारच

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *