पाच विभागांचा संयुक्त वाहतूक आराखडा सादर होणार

मनपा वाहतूक शाखेकडून प्राधिकरणासमोर सादरीकरण

नाशिक : प्रतिनिधी
शहरात होणार्‍या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने तयार केलेला पार्किंग व वाहतूक व्यवस्थापन आराखडा विभागीय आयुक्त तथा सिंहस्थ प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. प्रवीण गेडाम यांच्यासमोर मंगळवारी (दि. 2) सादरीकरण करण्यात आला. यावेळी डॉ. गेडाम यांनी महापालिका, पोलिस प्रशासनाची वाहतूक शाखा, सार्वजनिक बांधकाम विभाग, जलसंपदा व महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने एकत्रित आराखडा तयार करावा. त्यासाठी शहरातील पार्किंग स्थळांचा अभ्यास करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
महसूल आयुक्तालयात महापालिकेच्या वाहतूक शाखेने तयार केलेला आराखडा मंगळवारी विभागीय आयुक्तांना सादर करण्यात आला. यावेळी मनपा आयुक्त मनीषा खत्री, अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, शहर अभियंता संजय अग्रवाल, वाहतूक शाखेचे कार्यकारी अभियंता रवींद्र बागूल आदींसह अधिकारी उपस्थित होते.
डॉ. गेडाम यांच्या सूचनेनंतर आता पाचही विभागांकडून वाहतूक आराखडा लवकरात लवकर सादर केला जाणार आहे. प्रत्येक पर्वणीतील अमृतस्नानासाठी अंदाजे एक कोटी भाविक येण्याची शक्यता आहे. अशा वेळी महापालिकेकडून पार्किंग आणि वाहतूक व्यवस्थापन आराखडा तयार करून तो मंगळवारी सादर करण्यात आला. या आराखड्यातून भाविकांना घाटापर्यंत नेण्यासाठी नियोजनाचे चार टप्पे तयार करण्यात आले आहेत. बाह्य, आंतरपार्किंग व्यवस्था, भाविक वाहन वाहतूक मार्ग, पादचारी मार्ग आणि निवारा शेड, अशी व्यवस्था असणार आहे. 119.24 हेक्टर क्षेत्रावर बाह्य व आंतरपार्किंग निश्चित करण्यात आले आहे. मनपा प्रशासनाने सिंहस्थासाठी होणार्‍या गर्दीसंदर्भात नियोजन सुरू केले आहे. विभागीय आयुक्त तथा प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. गेडाम यांनी महापालिकेला पार्किंगसाठी नियोजन करण्याचे निर्देश दिले होते. गेेल्या महिन्यात महापालिकेत आयुक्त खत्री यांच्यासह पोलिस प्रशासन, एसटी महामंडळ, प्रादेशिक परिवहन विभाग, जलसंपदा, वाहतूक कक्षातील अधिकार्‍यांची बैठक झाली. या बैठकीत आराखड्याचे सादरीकरण करण्यात आले होते.
सिंहस्थासाठी येणार्‍या भाविकांची जास्त पायपीट होऊ नये, तसेच सिंहस्थातील पार्किंग ते घाटापर्यंत भाविकांना घेऊन जाण्यासह शहराबाहेर भाविकांना सोडण्याबाबत चर्चा झाली. त्यानुसार वाहतूक विभागाने आता शहराबाहेर पार्किंग, तेथून बसद्वारे घाटापर्यंत पोहोचविण्याचे नियोजन, तेथून पायी घाटापर्यंत पोहोचविणे तसेच गर्दी असेल तर त्यांच्यासाठी निवारा शेड उभारणे असे पार्किंगचेनियोजन केले.

17 ते 18 ठिकाणी वाहनतळ
शहरात विविध ठिकाणांहून येणार्‍या नऊ रस्त्यांवर पार्किंगसाठी 17 ते 18 ठिकाणी वाहनतळ उभारले जाणार आहे. 119.24 हेक्टर जागेवर पार्किंग असेल, पेठरोड, दिंडोरीरोड, धुळेरोड, पुणे आदी ठिकाणी वाहनतळांचा समावेश आहे. आराखडा सिंहस्थरोड, गंगापूररोड, त्र्यंबकरोड, मुंबईरोड, छत्रपती संभाजीनगर रस्ता प्राधिकरणाला सादर केल्यानंतर प्राधिकरणाच्या मंजुरीनंतर आराखड्यावर कार्यवाही सुरू होईल.

सिंहस्थाची नियमित बैठक मंगळवारी झाली. यावेळी विविध विभागांचा आढावा घेऊन शहर पार्किंग व वाहतूक आराखड्याचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी मनपासह इतर विभाग मिळून अंतिम संयुक्त आराखडा तयार करून सादर केला जाणार आहे.
– मनीषा खत्री, आयुक्त, मनपा

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *