भाविकांना त्रास; पितृपक्षात येणार हजारो वाहने
त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी
शहरात प्रवेश करण्यासाठी खड्डयांची शर्यत पार करावी लागण्याची वेळ भाविक व स्थानिकांच्या वाहनांवर आली आहे. शहराच्या प्रवेशद्वारी संत गजानन महाराज संस्थानसमोर असलेल्या त्रिफुली रस्त्यावर झालेल्या खड्डयांनी भाविकांचे स्वागत होत आहे.
श्रावण महिना पर्वकाल साधण्यासाठी लक्षावधी भाविक या खड्ड्यांमधूनच आले आणि माघारी गेले. गणपती बाप्पाचे आगमनदेखील याच खड्डेमय रस्त्याने झाले आणि आता गणपती बाप्पांचे विसर्जन होईल व पितृपक्षाला प्रारंभ होत आहे.
त्र्यंबकेश्वर येथे पितृपक्षात दररोज हजारो भाविक श्राद्धविधी करण्यासाठी येत असतात. कोट्यवधींची उलाढाल या पंधरा दिवसांत होत असते. मात्र, त्यासाठी येणार्या भाविकांचे स्वागत खडडयांनी होईल असे दिसते. हजारो वाहने या रस्त्याने येतात. याकडे संबंधित यंत्रणांचे दुर्लक्ष झाले आहे.
गोदावरी नदी पुलापासून ते संत गजानन महाराज प्रवेश कमान व त्यापुढे रस्त्याची चाळण झाली आहे. येथे असलेल्या त्रिफुलीवर वाहने चालवताना वाहनचालकांची होणारी कसरत पाहता केव्हाही अपघाताला सामोरे जाण्याची वेळ येऊ शकते. त्र्यंबक नगरपरिषद येथे टोलनाका लावून वाहन प्रवेश फी आकारणी करत असते.
या माध्यमातून नगरपरिषद प्रशासनाला वर्षाकाठी सव्वाकोटी रुपये उत्पन्न मिळते. मात्र, खराब झालेला रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा असल्याचे सांगण्यात येते. साहजिकच सार्वजनिक बांधकाम विभाग, त्र्यंबक नगरपरिषद यांपैकी कोणीही या रस्त्याच्या देखभालीचे उत्तरदायित्व घेत नसल्याने नागरिकांनी कोणाकडे दाद मागायची? असा सवाल उपस्थित झाला आहे. त्र्यंबकेश्वर येथे देवदर्शनासाठी लोकप्रतिनिधी व अधिकारी येत असतात. प्रशासकीय कामकाजासाठी अधिकारी नियमित येथे येतात. मात्र, रस्त्याच्या दुरवस्थेवर कोणीही चकार शब्द बोलत कसे नाही, असा प्रश्न येथे उपस्थित होत आहे.
प्रशासकीय अधिकार्यांचे दुर्लक्ष
मागच्या काही दिवसांपूर्वी साधू, महंतांच्या भेटीस आलेल्या प्रशासकीय अधिकार्यांना येथील साधू, महंतांनी तुम्ही या रस्त्याने आला तेव्हा खड्ड्यांचा त्रास जाणवला नाही का? असा खोचक प्रश्न विचारला होता. त्यानंतर या रस्त्याची दुर्दशा संपली अशी आशा नागरिकांना होती. मात्र, आजही रस्त्याची परिस्थिती जैसे थे राहिल्याने अधिकार्यांनी साधूंची मागणी मनावर घेतली नसून, त्यांनी केवळ भेटीची औपचारिकता पूर्ण केली असावी, अशी चर्चा येथे होत आहे.