झापवाडी येथील संगीतमय शिवपुराण कथेत करंजकर महाराज यांचा उपदेश
सिन्नर : प्रतिनिधी
80 हजार पत्नी असताना ज्याने सीतामातेवर डोळा ठेवला तो रावण होता. रावण ही व्यक्तिरेखा नसून, ती एक आपल्यामधील प्रवृत्ती आहे. आपल्यातही काही रावण प्रवृत्तीचे लोक आहेत. रावणासारखी प्रवृत्ती आपोआप तयार होते, तर राम हे घडवावे लागतात. म्हणून मुलांना राम काय होता ते शिकवा, असा उपदेश गणेश महाराज करंजकर यांनी केला.
गणेशोत्सवानिमित्ताने माजी नगरसेवक पंकज मोरे यांच्याकडून झापवाडी येथील जय बजरंग मित्रमंडळात आयोजित संगीतमय शिवपुराण कथेत ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून खासदार राजाभाऊ वाजे उपस्थित होते. रावण शंकराचा मोठा भक्त होता. रावणाने शंकराला प्रसन्न करत स्वत: शंकरालाच वरदानात मागितले. शंकर भोळा असल्याने त्यांनी रावणाला ज्योतिर्लिंग देत त्याची एका ठिकाणी स्थापना करून सलग 6 महिने पूजा करण्यास सांगितले. असे केल्यास रावण स्वत: शंकर भगवान होणार होता. त्यामुळे सर्व देवतांमध्ये हाहाकार माजला. यासाठी देवतांनी गणपतीला रावणाची पूजा भंग करण्यास पाठवले. शंकराने रावणाला दिलेले ज्योतिर्लिंग रावण लंकेत घेऊन जात असताना तो मध्येच थांबला असता गणपतीने गुराखी मुलाचे रूप घेतले. रावणाला अंघोळीसाठी जायचे असल्याने रावणाने गुराखी मुलाला बोलावून घेत त्यांच्या हातात ज्योतिर्लिंग दिले. हे लिंग एकदा खाली ठेवल्यास त्याला हलवता येणार नव्हते. रावण अंघोळीला गेला असता गुराख्याचे रूप घेतलेल्या गणपतीने ते लिंग जमिनीवर ठेवले. त्यामुळे रावणाला ते लिंग लंकेत नेता आले नाही आणि रावणाचे शंकर बनण्याचे स्वप्न भंगले.
त्याच ठिकाणी आज कोल्हापूरजवळ गोकर्ण महादेव ज्योतिर्लिंग म्हणून प्रसिद्ध आहे. तेव्हापासून देवतांनी गणपतीला कुठल्याही शुभकार्याच्या सुरुवातीला प्रथम तुझे पूजन करण्यात येईल, असे वरदान दिले. त्यामुळे गणपतीला विघ्नहर्ता असे म्हणतात. कुठलेही विघ्न दूर करण्यासाठी गणपतीची आराधना महत्त्वाची असल्याचे करंजकर महाराज म्हणाले. गणपती सांगतो भूतकाळात बघू नका, भविष्याकडे बघून वाटचाल केल्यास तुमचा उत्कर्ष होईल.
मनुष्याने शाकाहरी बनले पाहिजे. झाडांचा पाला खाणारा हत्ती ताकदवर आहे की मांस खाणारा वाघ, असा सवाल करंजकर महाराजांनी उपस्थित केला. काही लोक म्हणतात अंडे शाकाहारी आहेत. त्याऐवजी दूध प्या, असा उपदेश महाराजांनी दिला. अंड्याचा जन्म वासनेतून होतो तर दुधाचा जन्म वात्सल्यातून होतो, असे ते म्हणाले. यावेळी महाराजांनी गणपतीचे महात्म्य सांगत कुठलेही विघ्न दूर करावयाचे असल्यास गणपतीची आराधना करण्याचा उपदेश दिला. यावेळी त्यांनी ‘करूया प्रथम नमन’ हे गणपतीचे भजन सादर करत भाविकांना मंत्रमुग्ध केले. भैरवीने कार्यक्रमाचा समारोप झाला. त्यानंतर कार्यक्रमाचे आयोजक पंकज मोरे यांच्या हस्ते महाराजांचा सत्कार करण्यात आला. यावेळी करंजकर यांनी मोरे यांच्या समाजकार्याचे कौतुक केले.
5 हजार भाविकांना महाप्रसाद वाटप
करंजकर महाराजांच्या प्रवचनातंनर गणपतीची महाआरती घेण्यात आली. कार्यक्रमाला झापवाडीसह यशवंतनगर, मॉर्डन कॉलनी, स्वामी समर्थनगर, संजीवनीनगर, वृंदावननगर, द्वारकानगरीसह सरदवाडी रोडवरील उपनगरांतील भाविकांनी उपस्थिती लावली. कार्यक्रमानंतर तब्बल 5 हजार भाविकांना मसाले भात व लापशीच्या महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
जास्वंदाचे फूल गुणकारी
प्रवचनादरम्यान करंजकर महाराजांनी जास्वंदाच्या फुलाचे
आयुर्वेेदातील महत्त्व पटवून दिले. लाल जास्वंदाच्या फुलापासून बनवलेल्या तेलामुळे केसगळती कमी होते. पांढरा जास्वंद गावठी तुपात उकळून खाल्ल्यास अशक्तपणा दूर होतो. या फुलापासून बनवलेले तेल डोक्याला लावल्याने डोक्याला चालना मिळते. गणपती ही बुद्धीची देवता असल्याने गणपतीलाही जास्वंदाचे फुल आवडते, असे महाराजांनी सांगितले.