कनाशी आश्रमशाळेत 51 विद्यार्थिनींना विषबाधा!

अन्नपुरवठ्याच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; उपचार सुरू

कळवण : प्रतिनिधी
कळवण तालुक्यातील कनाशी आदिवासी आश्रमशाळेतील तब्बल 51 विद्यार्थिनी अचानक अस्वस्थ झाल्याने खळबळ उडाली आहे. उलट्या, ताप, जुलाब व अंगशिथिलपणा अशी लक्षणे दिसून आल्याने अन्नातून विषबाधा किंवा दूषित पाण्यामुळे असा प्रकार झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. सर्व विद्यार्थिनींवर कनाशी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू असून, त्यापैकी 5 विद्यार्थिनींना रुग्णालयात दाखल करून घेतले. इतर विद्यार्थिनींवर उपचार केले असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याने त्यांना आश्रमशाळेत पाठविल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.
आदिवासी विभागामार्फत कळवण प्रकल्पातील आश्रमशाळांना दररोजचे जेवण बागलाण तालुक्यातील दहिंदुले येथील ‘सेंट्रल किचन’मधून पुरवले जाते. या किचनमधूनच दळवट आश्रमशाळेतील दोन विद्यार्थिनींना दोन दिवसांपूर्वी असाच त्रास झाला होता.

कनाशी आश्रमशाळेतील विद्यार्थिनींना वातावरणातील बदलामुळे ताप, खोकला झालेला होता. त्यांची तपासणी करून त्यांना शाळेत सोडण्यात आले आहे. ज्या विद्यार्थिनींना जास्त त्रास होता, त्यांना कनाशी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले आहे व आजाराचे अजून दुसरे कारण आहे का? त्याची तपासणी करण्यात येत आहे.
-अकनुरी नरेश, सहाय्यक जिल्हाधिकारी

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *