गणेश विसर्जनाला गालबोट, जिल्ह्यात पाच जण बुडाले

ढोल-ताशाच्या गजरात बाप्पाला निरोप; 16 तास मिरवणूक

नाशिक : प्रतिनिधी
गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या; अर्धा लाडू फुटला- गणपती बाप्पा उठला… असा जयघोष करत लाडक्या गणरायाला भक्तांनी पुढच्या वर्षी लवकर येण्याचे आर्जव करत निरोप दिला. शहरात तब्बल 16 तास विसर्जन मिरवणूक चालली. एकीकडे लाडक्या बाप्पाला वाजतगाजत आणि ढोल-ताशाच्या गजरात गुलालाची उधळण करत निरोप दिला जात असतानाच विसर्जन करताना जिल्ह्यात पाच जणांचा बुडून मृत्यू झाल्याने विसर्जनाला गालबोट लागले आहे.

जिल्ह्यात गणेशोत्सव उत्साहपूर्ण वातावरणात साजरा झाला. शनिवारी (दि. 6) अनंत चतुर्दशीला लाडक्या बाप्पांना निरोप देण्यात आला. नाशिकमध्ये दुपारी बारा वाजता वाकडी बारव येथून विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ झाला. कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत ही मिरवणूक सुरू झाली. तब्बल सोळा तास ही मिरवणूक चालली. नाशिक ढोलचा दणदणाट आणि गुलालाची उधळण करत लाडक्या बाप्पाला पुढील वर्षी लवकर येण्याचे आमंत्रण देत निरोप देण्यात
आला.
यंदा महापालिकेने ठिकठिकाणी केलेल्या मूर्ती संकलन केंद्रांवर मोठी गर्दी केली होती. दिवसभर पावसाची रिपरिप सुरू असूनही भाविकांचा उत्साह कायम होता. शहराबाहेरील पहिने, त्र्यंबकरोड परिसरात यंदा गतवर्षापेक्षा कमी गर्दी दिसून आली.

सिन्नर आणि शहा येथे दोघांचा मृत्यू

सिन्नर : प्रतिनिधी
गणेश विसर्जनादरम्यान सिन्नर येथील सरदवाडी धरण आणि शहा येथील तळ्यात प्रत्येकी एका तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याच्या घटना घडल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. गणपती विसर्जनासाठी सिन्नर शहराजवळील सरदवाडी धरणावर गेलेल्या ओमप्रकाश सुंदरलाल लिल्हारे (वय 40, रा. सिल्व्हर लोटस स्कूलजवळ, सिन्नर) या कामगाराचा पाय घसरून धरणात बुडून मृत्यू झाला. ते मूळचे गोंदिया जिल्ह्यातील रहिवासी होते. काही वर्षांपासून ते माळेगाव औद्योगिक वसाहतीतील एचएनजी गॅस कंपनीत कार्यरत होते. दुसर्‍या घटनेत तालुक्यातील शहा येथील रामा पाराजी कांदळकर (वय 35) या तरुणाचा विसर्जन सुरू असताना तळ्यात पाय घसरून पडल्याने बुडून मृत्यू झाला.
ओमप्रकाश लिल्हारे हे सिल्व्हर लोटस स्कूलच्या मागे सरदवाडी धरणाच्या सांडव्यावर शनिवारी (दि.6) दुपारी साडेतीनच्या सुमारास गणेश विसर्जनासाठी गेले असताना, त्यांचा तोल जाऊन ते पाण्यात बुडाले. यावेळी त्यांच्यासोबत धोंडिबा बिन्नर, विकास राठोड तसेच लिल्हारे कुटुंबीयही उपस्थित होते. नागरिकांनी तत्काळ धाव घेऊन त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. अखेर बर्‍याच प्रयत्नांनंतर त्यांना बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. सिन्नर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलीस हवालदार सुधाकर गोसावी पुढील तपास करीत आहेत.
दुसर्‍या घटनेत तालुक्यातील शुक्रवारी (दि. 5) शहा येथील रामा पाराजी कांदळकर याचा गणेश विसर्जनादरम्यान पाय घसरून तळ्यात तोल जाऊन पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याचे घटना घडली आहे. गावातील तळ्यात विसर्जन सुरू असताना पाय घसरून तो पाण्यात पडला. विसर्जनादरम्यान जमलेल्या इतरांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यास तळ्यातून तात्काळ बाहेर काढून वावी येथे उपचारासाठी दाखल केले. मात्र तत्पूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली. त्याच रात्री या तरुणावर अंत्यसंस्कार करण्यात आले. कांदळकर यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई, वडील असा परिवार आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *