पावसाने उघडीप दिल्याने पाणीपातळी कमी होणार
निफाड : तालुका प्रतिनिधी
जिल्हाभरात सुरू असलेल्या पावसामुळे धरण जलसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने तसेच नदी-नाले, पाझर तलावदेखील फुल्ल भरले आहेत. असे असतानाच सतत पावसाबरोबरच इगतपुरी, दिंडोरी तालुक्यांतील धरणांमधून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आले आहे. नांदूरमध्यमेश्वर धरणाच्या गेटमधून रविवारपासून (दि.7) 22,345 क्यूसेक विसर्ग करण्यात येत आहे.
इगतपुरी त्र्यंबकेश्वर, दिंडोरी तालुक्यांत मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने यंदा नांदूरमध्यमेश्वर धरणातून पाचव्यांदा विसर्ग वाढविण्यात आला आहे. कारण सर्व धरणे ओव्हरफ्लो झाल्याने आणि संततधार सुरूच असल्याने धरण साठ्यात वाढ झाली. खबरदारीचा उपाय म्हणून नदीपात्रात विसर्ग वाढविण्यात आला आहे. सध्या पालखेड धरणातून 8000 क्यूसेक, गंगापूर धरणातून 3,579 क्यूसेक, तर दारणा धरणातून 6300 क्यूसेक आणि कडवा धरणातून 914 क्यूसेकने विसर्ग करण्यात येत आहे. याबरोबरच सतत पावसाचे पाणीदेखील नदी-नाल्यांद्वारे नांदूरमध्यमेश्वर धरणात येत असल्याने नांदूरमध्यमेश्वर धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात येत. यंदा कादवा, गोदावरी, दारणा या तीनही नद्या अगदी उन्हाळ्यातील मे महिन्यापासूनच पूरस्थितीत वाहत आहेत. जवळपास सव्वाचार महिन्यांचा कालावधी लोटला असतानाही या नद्यांच्या पातळीत कुठलीही घट झाली नाही. उन्हाळ्यात पाणीटंचाई जाणवणार नाही.
धरण परिसरात जाण्यास मनाई
दारणा धरणाचा सोमवारी सायंकाळी 6.30 वाजता विसर्ग कमी केला असून, तो 4,600 क्यूसेक करण्यात आला. पालखेड धरणाचा विसर्ग 2800 वर, तर गंगापूर व कडवा धरणाचा विसर्ग जैसे थे ठेवण्यात आला आहे. साहजिकच रात्रीतून नांदूरमध्यमेश्वर धरणाचा विसर्गदेखील कमी करण्यात येणार आहे. सुरक्षेच्या कारणास्तव धरण परिसरात, तसेच गेटकडे आणि नदीकडे जाण्यास मनाई केली आहे.