सात महिने उलटूनही कार्यवाही नाही
नाशिक : प्रतिनिधी
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वरच्या कुशावर्त व नाशिकच्या रामकुंड परिसरात हेलिपॅड उभारण्याचा निर्णय सिंहस्थ प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. प्रवीण गेडाम यांनी घेतला आहे. सात महिन्यांपूर्वी याबाबत त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग, नाशिक महापालिका व त्र्यंबकेश्वर नगरपालिकेला हेलिपॅडसाठी जागा शोधण्याच्या सूचना दिल्या होत्या. दरम्यान, रामकुंड परिसरात हेलिपॅड उभारण्याबाबत नाशिक महापालिकेसह सार्वजनिक बांधकाम विभाग अनभिज्ञ असून, दोन्ही विभाग आता टोलवाटोलवी करत आहेत. सात महिने उलटूनही हेलिपॅडसंदर्भात कुठलीही कार्यवाही होऊ
शकली नाही.
कुशावर्त परिसरात सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हेलिपॅड तयार केले जाणार आहे. मात्र, रामकुंड येथे उभारल्या जाणार्या हेलिपॅडविषयी आम्हाला काहीही माहीत नसल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले आहे. आगामी सिंहस्थ काळात साधू, महंत व भाविकांबरोबरच अतिमहत्त्वाच्या व्यक्तीदेखील अमृत स्नानासाठी नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे
येणार आहेत.
त्यांच्या सुविधेसाठी नाशिकच्या रामकुंड व त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त कुंडाजवळ हेलिपॅडची व्यवस्था केली जाणार आहे. त्यासाठी कुंभमेळा प्राधिकरण समितीने राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागासह महापालिकेला हेलिपॅडसाठी जागेचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. कुंभमेळा प्राधिकरण समितीने निधी नियोजन करत 3,326 कोटींच्या कामांना मंजुरी दिली आहे. प्राधान्यक्रमाने विकासकामांवर निधी खर्च करण्याच्या सूचना प्राधिकरणाकडून दिलेल्या आहेत. सिंहस्थांतर्गत तयार केल्या जाणार्या रस्त्यांसाठी प्राधान्यक्रम ठरविण्याची जबाबदारी पोलीस प्रशासनावर सोपविण्यात
आली आहे. त्यानुसारच रस्ते डांबरीकरणाची कामे हाती घेण्याचे
निर्देश नाशिक महापालिका व त्र्यंबकेश्वर नगरपालिकेला देण्यात आले आहेत. भाविक रस्ते मार्गाने येणार असले, तरी अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी हेलिपॅडची सुविधा उपलब्ध करून द्यावी लागणार आहे. त्याअनुषंगाने जागेचा शोध घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
रामकुंड परिसरात हेलिपॅड तयार करण्याबाबत आम्हाला काही सूचना नाही. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडे नियोजन असेल.
– संजय अग्रवाल,
शहर अभियंता, मनपाहेलिपॅडबाबत आम्हाला काही माहीत नाही. हा विषय नाशिक महापालिकेअंतर्गत येतो. त्र्यंबकेश्वर येथे हेलिपॅड उभारण्याचे नियोजन आहे; परंतु रामकुंड परिसरात हेलिपॅड तयार करण्यासंदर्भात काही माहीत नाही.
– उदय पालवे, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग