सटाणा-नामपूर रस्त्यावर कांदा कंटेनरचा अपघात

सटाणा ः प्रतिनिधी
नामपूरहून सटाण्याकडे कांदा घेऊन येणारा एक कंटेनर दोध्याड नाल्यावरील पूल पार करून जात असताना, चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या मारुती मंदिराजवळ उलटला. या अपघातात कंटेनरचे मोठे नुकसान झाले असून, मंदिरालाही अपघाताचा धक्का बसला तर रस्त्यावर कांदे पसरले होते.
अपघात इतका भीषण होता की, कंटेनर उलटून थेट मंदिराच्या भिंतीवर जाऊन आदळला. त्यामुळे मंदिराच्या काही भिंतींचे नुकसान झाले आहे. कंटेनरमधील कांदे मोठ्या प्रमाणात रस्त्यावर सांडले असून, त्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.
अपघाताची माहिती मिळताच परिसरातील स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. त्यांनी रस्त्यावर सांडलेला माल बाजूला केला व जखमी वाहनचालकास बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात पाठवले. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला असून. अपघाताचे नेमके कारण अद्याप समजू शकले नसले तरी वाहनचालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला
जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *