प्रभावी अंमलबजावणी करावी : सीईओ ओमकार पवार
नाशिक : प्रतिनिधी
स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण)अंतर्गत जिल्ह्यात दरवर्षी स्वच्छता ही सेवा पंधरवडा आयोजित केला जातो. 2017 पासून सुरू असलेला हा उपक्रम स्वयंसेवी वृत्ती आणि सामूहिक कृतीला चालना देण्यासाठी महत्त्वाचा ठरला आहे. यंदाही हा पंधरवडा 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2025 दरम्यान राबविण्यात येणार आहे. यावर्षीची थीम स्वच्छोत्सव अशी आहे. या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी केले आहे.
या पंधरवड्यात जिल्हाभर अनेक उपक्रम घेण्यात येणार आहेत. अस्वच्छ ठिकाणे, सार्वजनिक स्थळे, कार्यालये, संस्था, बाजारपेठा, वाहतूक केंद्रे, प्रमुख रस्ते, पर्यटन स्थळे, धार्मिक स्थळे, नदीकिनारे याठिकाणी स्वच्छता मोहीम राबवली जाणार आहे. सफाई मित्र सुरक्षा शिबिर या उपक्रमांतर्गत सफाई मित्रांच्या आरोग्यासाठी विशेष शिबिरे घेण्यात येतील. 25 सप्टेंबर रोजी श्रमदान दिवस म्हणून घोषित करण्यात आला आहे.
पर्यावरणपूरक उपक्रम,
जनजागृती
या मोहिमेत प्लास्टिक वापराविरोधात जनजागृती केली जाणार आहे. एकल वापर प्लास्टिक टाळण्यासाठी ग्रामपातळीवर प्रबोधन केले जाईल. त्याचबरोबर वृक्षारोपण, नाल्यांची स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, ओला-सुक्या कचर्याचे विभाजन अशा उपक्रमांना प्राधान्य दिले जाणार आहे.
या पंधरवड्याचा समारोप 2 ऑक्टोबर 2025 रोजी स्वच्छ भारत दिन साजरा करून करण्यात येईल. यानिमित्त जिल्ह्यात विशेष स्वच्छता मोहिमा, जनजागृती रॅली आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येतील, अशी माहिती पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपक पाटील यांनी दिली.
राबविण्यात येणारे उपक्रम
सफाई मित्र सुरक्षा शिबिर : सफाई मित्रांच्या आरोग्यासाठी विशेष तपासणी व मार्गदर्शन स्वच्छता मोहिमा : कार्यालये, बाजारपेठा, पर्यटन स्थळे, नदी-घाट, ऐतिहासिक व धार्मिक स्थळे याठिकाणी विशेष स्वच्छता. प्लास्टिकमुक्ती जनजागृती : एकल वापर प्लास्टिकविरोधात मोहीम पर्यावरणपूरक उपक्रम : वृक्षारोपण, ओला-सुक्या कचर्याचे व्यवस्थापन, नाले-घाट स्वच्छता. 25 सप्टेंबर : श्रमदान दिवस- सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणात साफसफाई 2 ऑक्टोबर : स्वच्छ भारत दिन- जनजागृती रॅलीसह समारोप.
या मोहिमेत युवक मंडळे, शाळा-महाविद्यालये, एनएसएस व एनसीसी विद्यार्थी, महिला बचतगट, सामाजिक संस्था तसेच शासकीय कर्मचारी यांनी सक्रिय सहभाग द्यावा. ग्रामस्तरावर उपक्रमांचे आयोजन करून व्यापक प्रमाणात प्रचार व प्रसिद्धी करण्यात यावी. प्रत्येक गावात नागरिकांचा सहभाग वाढवून अभियान अधिक परिणामकारक राबवावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी केले आहे.