नाफेडमार्फत खरेदी केलेला कांदा होतोय खराब

चाळी फोडल्यावर झाले उघड; सहकारी संस्थाचालकांच्या अडचणी वाढल्या

लासलगाव : वार्ताहर
नाशिक जिल्ह्यासह राज्यभरात नाफेड आणि एनसीसीएफमार्फत तब्बल तीन लाख मेट्रिक टन कांद्याची खरेदी करण्यात आली होती. मात्र, या बफर स्टॉकमधील कांद्याचा साठा आता मोठ्या प्रमाणावर खराब होऊ लागल्याचे गंभीर चित्र समोर आले आहे. कोलकाता, गुवाहाटी आणि चेन्नई येथे कांदा पाठवण्यासाठी शासकीय गोडावूनमधील चाळी फोडण्यात आल्यावर ही धक्कादायक बाब उघड झाली आहे.
नाफेड, एनसीसीएफच्या कांद्याच्या साठ्याच्या प्रतवारीदरम्यान तब्बल 20 ते 25 टक्के कांदा खराब झाल्याचे स्पष्ट झाले आहे. उर्वरित चाळी फोडल्यावर अजून किती कांदा निकृष्ट निघेल, याबाबत अनिश्चितता कायम आहे. त्यामुळे खरेदी केलेला हा बफर स्टॉक प्रत्यक्षात किती उपयुक्त ठरेल, याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

केवळ 65 टक्के रिकव्हरी कशी साधायची?

केंद्र सरकारच्या वतीने खरेदी केलेल्या या कांद्याच्या देखरेख व साठवणुकीची जबाबदारी खरेदीदार सहकारी संस्था व मंडळांवर सोपविण्यात आली आहे. मात्र, कांद्याचा साठा खराब होऊ लागल्याने फक्त 65 टक्के रिकव्हरी कशी साधायची, हा मोठा प्रश्न संस्थाचालक व संचालक मंडळासमोर उभा राहिला आहे. खराब झालेल्या कांद्याची विल्हेवाट लावणे, इतर बाबींमुळे या संस्थांच्या आर्थिक घडामोडी आणखी गुंतागुंतीच्या होऊ लागल्या आहेत.

कांदा उत्पादक आर्थिक संकटात

खरेदी केलेल्या तीन लाख मेट्रिक टन कांद्यापैकी काही कांदा कोलकाता, गुवाहाटी, चेन्नई यांसारख्या शहरांमध्ये उपलब्ध करून दिला जात आहे. मात्र, दोन ते अडीच महिने उलटून गेल्यानंतरही नाफेड, एनसीसीएफला दिलेल्या कांद्याचे पैसे मिळालेले नाही, दुसरीकडे हा कांदा बाजारात आल्यामुळे कांद्याचे बाजारभाव घसरल्याने शिल्लक असलेल्या कांद्याचा उत्पादन खर्च निघणेही मुश्कील झाला आहे. या दुहेरी संकटामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. दसरा, दिवाळीसाठी घरामध्ये पैशाची गरज असताना आता काय करावे, असा प्रश्न आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *