संघर्षातून उभी राहिलेली धैर्याची कहाणी
पुणे शहरात प्रवास करताना रिक्षावाल्यांची टाळाटाळ ही काही नवी गोष्ट नाही. जेवायची वेळ झाली, दुसरे भाडे आहे, अशा अनेक कारणांनी ते ग्राहकांना नकार देताना दिसतात. पण अशाच परिस्थितीत एका महिला रिक्षाचालक ताईंची भेट झाली आणि तो अनुभव खास ठरला.
कोथरूडच्या मनीषा शिंदे गेल्या दीड वर्षांपासून रिक्षा चालवतात. सहज संवाद साधला असता, त्यांनी आपली कहाणी उलगडली. मनीषा म्हणाल्या, की पुण्यात आजघडीला 9-10 महिला रिक्षा चालवतात. पुरुष रिक्षाचालकांच्या बायका धुणीभांडी करून उदरनिर्वाह करतात. पण मी धुणीभांड्यांऐवजी रिक्षा चालवायचा निर्णय घेतला. यात माझ्या पतीनेही मला साथ दिली, ते स्वतः ओलाचालक आहेत.
रोजंदारीबाबत सांगताना त्या पुढे म्हणाल्या, की दररोज साधारण 700-800 रुपयांची कमाई होते. यातून 100-200 रुपये गॅसवर खर्च होतात. म्हणजे दिवसाला 600-700 रुपये हातात पडतात. धुणीभांड्यांच्या कामातून एवढे उत्पन्न मिळाले नसते. सुरुवातीला रस्ते चुकायचे, पण आता शहराच्या कानाकोपऱ्यांत निःसंकोच जाते.
पुरुष रिक्षाचालक अनेकदा जवळच्या भाड्यासाठी कंटाळा करतात. मात्र, मनीषा कोणतेही भाडे नाकारत नाहीत. हो, लोक कधी हिणवतातही. पण माझ्या कष्टाने पैसा कमावतेय, हे समाधान खूप मोठं आहे, असे त्या ठामपणे म्हणाल्या.
ठाणे-मुंबईसारख्या पुण्यातही गुलाबी रिक्षा सुरू झाल्या, तर महिलांविषयीचा आदर आणि प्रवाशांचे कुतूहूल वाढेल, अशी त्यांची अपेक्षा आहे.
आजच्या काळात समाजातली ही रिक्षावाली ताई फक्त रिक्षा चालवत नाही, तर धैर्य, आत्मविश्वास आणि सन्मानाने जगण्याचा नवा मार्ग दाखवत आहे.