निकष शिथिल करून शेतकर्‍यांना मदत

मुख्यमंत्री ः अतिवृष्टीग्रस्तांच्या दुःखावर सरकारची फुंकर

सोलापूर :
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकर्‍यांना मदत करताना नियम, निकष सर्व शिथिल करुन मदतीचा हात देण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. काल फडणवीस यांनी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या सोलापूर जिल्ह्यातील माढा येथे पाहणी केली. यावेळी त्यांनी औराद शहाजनी (ता. निलंगा, जि. लातूर) येथे शेतकर्‍यांशी संवाद साधला.
अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची माहिती घेतली. यावेळी मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार संभाजी पाटील निलंगेकर व अधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला. येथील समस्या आम्ही जाणून घेत आहोत. काही कामे येथे आधी करावी लागतील. अशा प्रकारच्या घटना सातत्याने वाढत आहेत. महिनाभराचा पाऊस तीन दिवसांत पडतो. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी वाढते. दोन नद्यांच्या संगमामुळे एका नदीचा प्रवाह अडतो आणि ते सगळे पाणी आतमध्ये येते. संभाजी पाटील निलंगेकर यांनी काही सुधारणा सुचवल्या आहेत, त्या करून घेणार आहोत. याठिकाणी एक पूरसंरक्षक भिंत बांधली जाणार आहे, तरच या ठिकाणच्या शेतकरी व गावकर्‍यांना मदत करू शकू.
नागरिककेंद्रित मदत
शेतकर्‍यांना आम्ही मदत करणारच आहोत, पण त्याचसोबत ज्यांच्या घरांचं नुकसान झालंय, अन्नधान्याचं नुकसान झालंय अशांनादेखील आम्ही मदत करणार आहोत. कुठलेही अधिकचे निकष न लावता, आवश्यकता असेल तिथे निकष शिथिल करून नागरिक केंद्रित मदत करायची आहे. केवळ नियमांवर बोट न ठेवता नागरिकांना, शेतकर्‍यांना, मजुरांना मदत होईल, अशा प्रकारची मदत करण्याचे
निर्देश आम्ही दिले आहेत, असेही बोलताना मुख्यमंत्री म्हणाले.
सगळ्या प्रकारच्या सवलती
आपत्ती सुरू असतानाच पैसे रिलीज केले आहेत, दिवाळीपूर्वीच सर्वांना मदत दिली जाणार आहे. ओला दुष्काळ ही बोलीभाषेतील टर्म आहे.

मदतीच्या किटद्वारे प्रचार टेम्पो परत घेऊन जा!
मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे आलेल्या महाप्रलयामध्ये अनेक गावं उद्ध्वस्त झाली आहेत. त्यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना शिंदे गटाचे मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून मदत केली जात आहे. मात्र, मदतीच्या किटवर एकनाथ शिंदे, प्रताप सरनाईकांचे फोटो छापण्यात आले आहेत. या प्रचारावरून धाराशिवमधील ग्रामस्थ संतापले. गेल्या तीन दिवसांपासून कोणीच आले नाही. आम्हाला तुमची मदत नको, तुमचा टेम्पो घेऊन जा…असा आक्रमक पवित्रा नागरिकांनी घेतला. काही नागरिकांनी आमचा संसार पाण्याखाली गेलाय, आम्हाला मदत घेऊ द्या, असा पवित्रा घेतला.

उपमुख्यमंत्री शेतकर्‍यांच्या बांधावर

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सोलापूर जिल्ह्यातील मुंगशी माढा गावामध्ये पाहणी केली. त्यांनी सीना नदीवरील बंधार्‍याचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना यावेळी दिल्या आहेत. या दौर्‍यादरम्यान, अजित पवारांनी लोकांशी संवाद साधला आणि शेतकर्‍यांनी आपल्या व्यथा मांडल्या आहेत. अनेक गावांना भेटी देत त्यांनी नुकसानीची माहिती घेतली. शेतकर्‍यांनी सांगितले की, गेल्या पन्नास वर्षांत इतका पाऊस कधीच झाला नव्हता, ज्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. घरे, जनावरे, मोटारी, पाईप, डीबी, पोल आणि तारा वाहून गेल्या आहेत. ऊस पिकाचेही मोठे नुकसान झाले आहे. शेतकर्‍यांनी शासनाकडे सरसकट नुकसान भरपाईची मागणी केली आहे.

हेक्टरी पन्नास हजार द्या, शेतकर्‍यांची मागणी

हेक्टरी कमीत कमी पन्नास हजार रुपये तरी द्यायचे पाहिजे, अशी मागणी शेतकर्‍यांनी केली आहे. सरसकट ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणीही ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोटारी आणि डिपोची भरपाई करण्याचे आश्वासन दिले आहे. नदीकाठच्या सर्व गावांचे पूर्ण नुकसान झाले असून, सरकार यावर काय निर्णय घेते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *