इंदिरानगरमध्ये वाहनांची तोडफोड

इंदिरानगर : वार्ताहर
नाशिकमध्ये पुन्हा एकदा वाहनांची तोडफोड करण्याचा प्रकार घडला. तिसर्‍या माळेला रात्री दांडिया संपल्यानंतर राजीवनगरमध्ये काही समाजकंटकांनी हैदोस घालून गाड्यांची तोडफोड केली. यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कोहिनूर कॉलनीचे रहिवासी रवींद्र देवराम यांनी रात्री सव्वादहा वाजेच्या सुमारास माजी सभागृहनेते सतीश सोनवणे यांना फोन करून काही गुंड गाडी फोडत असल्याची माहिती दिली. सोनवणे त्यांच्या कार्यकर्त्यांसह घटनास्थळी पोहोचेपर्यंत मंगेश जोशी, पवार यांच्यासह पाच चारचाकी वाहनांची मोडतोड करून या समाजकंटकांनी राजीवनगर वसाहतीच्या दिशेने पोबारा केला. याबाबत इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनावणे यांना माहिती मिळताच त्या तत्काळ हजर झाल्या. दरम्यान, हिंदू जनसंपर्क कार्यालयाचे सागर देशमुख यांनीदेखील नागरिकांची भेट घेऊन त्यांना धीर दिला. तसेच माजी नगरसेवक सतीश सोनवणे यांनीदेखील परिस्थिती जाणून घेत नागरिकांना सावरले. सदरची घटना सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाली होती. सोनवणे यांनी प्रभाग 30 मध्ये बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यामुळे घटना कैद करणे शक्य झाले. त्याआधारे पोलिसांनी तपास करून सात अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले असून, पुढील तपास पोलीस करत आहेत. या प्रकरणामुळे मात्र इंदिरानगरवासीय भयभीत झाले आहेत. अशा समाजकंटकांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांमधून करण्यात येत आहे.

सणासुदीचा काळ आहे. या काळात आणखी पोलिस गस्त वाढवावी, जेणेकरून अशा घटना होणार नाही. गुन्हेगारांवर जरब बसण्यासाठी पोलिसांनी कठोर पावले उचलावीत.
– सागर देशमुख, हिंदू जनसंपर्क कार्यालय

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *