व्यावसायिकांचे नुकसान, दुकानांतील गाळ काढत साफसफाई
पंचवटी : प्रतिनिधी
शनिवार व रविवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरीला आलेल्या महापुरामुळे गोदाकाठच्या अनेक दुकानांचे मोठे नुकसान झाले. दुकानांत, टपर्यांमध्ये, तसेच घरांत साचलेला गाळ काढून स्वच्छ करण्याचे काम सोमवारी (दि. 29) गोदाकाठ भागात व भांडीबाजारात सुरू होते.
महापुरामुळे गोदाघाटावरील चेंबरचे ढापे वाहून गेले होते. त्यामुळे चेंबर उघडे पडले आहेत. नारोशंकर मंदिराच्या समोरच्या भागातील श्री कपालेश्वर रेस्टॉरंट, रसवंतीचे पत्रे वाहून गेल्याने हा भाग ओसाड पडलेला दिसला. पाण्यामुळे काँक्रीट निघून गेल्याने केबल उघड्या पडल्या आहेत. कमकुवत झालेल्या रामसेतूवरून पुराचे पाणी वाहिल्याने या पुलाचा काही भागातील स्लॅब पुन्हा उखडला आहे. अशा धोकादायक पुलावरून नागरिक जा-ये करताना दिसत होते. कपुरथळा मैदानाच्या भागात असलेल्या हॉटेलचे पत्र्यांसह इतर साहित्य वाहून गेले. शाहीमार्गावरील झोपड्यांचे अतिक्रमण केलेले नागरिक पूर ओसरताच पुन्हा आपल्या जागेवर येऊन साफसफाई करताना दिसले. गोदाघाट रस्त्यावर कपालेश्वर मंदिराच्या बाजूला दुकाने, टपर्या, हॉटेल येथे साचलेला गाळ, पाणी काढण्याचे काम सुरू होते. सांडव्यावरची देवी मंदिराच्या बाजूचे फुले-हार, श्रीफळ, पूजासाहित्य, अगरबत्ती यांचे दुकाने सावरून त्यांचे व्यवसाय सुरू झाले. देवी मंदिर व भोवतालचा परिसर स्वच्छ करण्यात आला होता. नवरात्रोत्सव सुरू असल्याने भाविक मोठ्या संख्येने मंदिरात दर्शनास येत होते.
पूर ओसरल्यानंतर रस्त्यांवर व इतरत्र साचलेला गाळ अग्निशमन दलाच्या बंबांच्या सहाय्याने धुण्यात येतो. मात्र, काही ठिकाणचा अपवाद वगळता रस्ते, तसेच गोदाकाठाच्या रस्ते, चतुःसंप्रदाय आखाड्यासमोरील भाग, महालक्ष्मी मंदिरासमोरील भाग, नवीन शाहीमार्ग आदी भागात गाळ साचलेला होता. तो काढण्यात आला नसल्याने स्थानिक नागरिकांसह पर्यटक व भाविकांना ये-जा करण्यास अडचण येत होती. त्या गाळाची दुर्गंधी नागरिकांसह भाविकांना असह्य
करणारी होती.
गोदाकुटीतील साहित्य गेले वाहून
रामतीर्थ गोदावरी सेवा समितीच्या आरतीचे साहित्य ठेवण्यात येणारी कंटेनरची गोदाकुटी पुराच्या पाण्यात वाहून जात रामसेतूला अडकली होती. ती काढण्यात आली; परंतु तिच्यातील सर्व साहित्य वाहून गेले.