खरेदीचा सुपर संडे

नाशिक : प्रतिनिधी
दिवाळी अवघ्या दिवसावर आली आहे. त्यामुळे दिवाळी खरेदी साठी बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. तसेच अनेक कंपन्यांचे बोनस झाले आहेत. त्यामुळे नागरिक खरेदी करण्यासाठी शहरातील बाजारपेठेत गर्दी करत आहेत. त्यात काल (दि.12) रोजी रविवार असल्याने सुट्टीचे औचित्य. साधत खरेदीसाठी बाजारपेठेत चांगलीच गर्दी झाल्याचे चित्र पाहावयास मिळत होते.

ग्राहकांनी बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात गर्दी केली जात आहे. दिवाळी हा चैतन्याचा सण दिवाळीसाठी लागणार्या पणत्या ,आकाश कंदील, फटाके, मिठाई, फराळ, लाईटिंग, कपडे यांची खरेदी केली जात आहे. शहरातील औद्योगिक वसाहतीतील काही कंपन्यांचा बोनस झाल्याने शहरात दिवाळी खरेदीला वेग आला आहे. तर अनेक कंपन्यांचे या आठवड्यात बोनस होणार आहे. मेनरोड, रविवार कारंजा, सराफ बाजार यासह उपनगरातील बाजारपेठांत उत्साहाचे वातावरण आहे.
दिवाळीच्या मुहूर्तावर खरेदी करण्यात येणारे दागिने, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू व वाहन खरेदीच्या बुकिंगला सुरुवात झाली आहे. दिवाळीच्या निमित्ताने अनेक व्यावसायिकांनी ग्राहकांना आकर्षित करणार्‍या विविध ऑफर्स जाहीर केल्या आहेत. सराफांच्या दुकानात लकी ड्रॉ ऑफर्स देण्यात येत आहेत. इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या दुकानात डिस्काउंट ऑफर्स दिल्या जात आहेत. वाहन खरेदीवरदेखील ऑफर्स देण्यात येत आहेत.
दिवाळीनिमीत्त मित्र मैत्रीणी आणि जवळच्या नातेवाईकांना गिफ्ट्स खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत गर्दी केली जात आहे. या सर्वांच्या खरेदीचा उत्साह बाजारपेठेत जाणवू लागला आहे.

शहरातील वाहतूक मार्गात बदल

दिवाळीला काहीच दिवस राहिले असल्याने शहरातील बाजारपेठेत गर्दीचे प्रमाण वाढले आहे.परिणामी वाढत्या गर्दीमुळे होणारी वाहतूक कोंडी रोखण्यासाठी शहरातील मुख्य रस्त्यावरील वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे. मात्र वाहतूक मार्गात बदल होऊन ही शहरातील मुख्य रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी कमी झाली नसल्याचे चित्र आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *